नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ

सर्दी ताप, खोकला अशा आजारांसह स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे.

Updated: Jul 31, 2019, 05:43 PM IST
नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडताच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी ताप, खोकला अशा आजारांसह स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या बघता जिल्हा प्रशासननही हादरून गेलं आहे. आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.

नाशिक शहरात मुसळधार पाऊस होत नाही तोच स्वाइन फ्लू आणि डेंगूने डोक वर काढलंय. स्वाइन फ्ल्यूचे जानेवारी पासून आत्तापर्यंत १५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर डेंगूचे रुग्ण देखील वाढले आहेत. जुलै महिन्यात ३० रुग्ण आढळून आलेय. तर जानेवारी पासून ४५ रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या वर्षीही हीच परिस्थिती होती. राज्यात या आजारांचे सर्वाधिक रुग्ण नाशिकमध्ये होते. तेच चित्र यंदाही आहे. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

दुषित पाणी, डासांची उत्पती त्यामुळे साथीचे रोग पसरतायेत. सर्पदंशाचे रुग्ण ही वाढतायेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी करू लागले आहे.

पावसाळ्यात साथीचे आजारी सगळीकडेच दिसून येतात. मात्र नाशिकमध्ये हे चित्र गंभीर आहे. स्थानिक प्रशासना समोर मोठं आव्हान आहे.