धक्कादायक! रिल्सला 100K लाईक्स मिळणं तरूणाला पडलं महागात, ओळखीच्यांनीच...

रिल्सचा नाद लागलेल्या तरूण-तरूणींनो ही बातमी तुमच्यासाठी,वेळीच व्हा सावध

Updated: Aug 26, 2022, 12:40 PM IST
धक्कादायक! रिल्सला 100K लाईक्स मिळणं तरूणाला पडलं महागात, ओळखीच्यांनीच...  title=

विशाल करोळे झी मीडिया, संभाजीनगर : मागील काही वर्षात तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून मोबाईलमध्ये रिल्स व्हिडीओ बनवण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकांनी तर रिल्स बनवणं करिअर म्हणून निवडलं आहे. प्रत्येकाचा जास्तीत जास्त लाईक्स मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र संभाजीनगरमध्ये इन्सटाग्रामवर लाईक वाढले म्हणून तरूणाला त्याच्या ओळखीच्याच तरूणांनी मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. संभाजीनगरमधील हर्सूलमध्ये ही घटना घडली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 
20 वर्षीय तरूण ऋतीक महेंद्रकरला रिल्स करण्याची आवड आहे. तो वेगवेगळे व्हीडिओ टाकत असतो, नेहमीप्रमाणे त्याने रिल करत 
व्हिडीओ पोस्ट केला त्या रिलला 100K लाईक्स मिळाले. तो रिल चांगलाच व्हायरल झाला मात्र दोन दिवसांनंतर ओळखीच्याच काही तरूणांनी त्याला रस्त्यात अडवलं. तु रिल का टाकत असतो असा सवाल करत त्याला दमदाटी करत धमकी दिली.

तुझा चेहराच खराब करतो असं म्हणत ऋतीकला लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. इतकच नाही तर त्याच्या डोळ्यावर ठोसा लगावला आणि कटरने त्याच्या छातीवर आणि पाठीवर वार केले. ऋतीकच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे. त्यानंतर ऋतीकने पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

माझे लाईक्स आमि फॉलोवर्स वाढत आहे म्हणून मला मारहाण केल्याचं ऋतीकने पोलिसांना सांगितलं. माझ्या गाडीची मोडतोड केल्याचंही ऋतीकने पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी या  प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, युवकांना लाईक्स फॉलोवर्सचं वाढवण्याचं व्यसन लागत चाललं आहे. मात्र आता हे व्यसन जीव घेण्यापर्यंत जात असेल तर याला कुठंतरी आळा घालण्याची गरज आहे.