'नो पार्किंग'च्या वसुलीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

असंख्य तक्रारी आणि दंड वसुली तसेच टॉइंग वाहनातून  वाहने उचलण्यालाच प्राधान्य देणारया वाहतूक विभागामध्ये आता अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.  

Updated: Jun 13, 2022, 09:30 AM IST
'नो पार्किंग'च्या वसुलीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय title=

सागर आव्हाड, पुणे : असंख्य तक्रारी आणि दंड वसुली तसेच टॉइंग वाहनातून  वाहने उचलण्यालाच प्राधान्य देणारया वाहतूक विभागामध्ये आता अतीवरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे.  वाहतूक पोलिसांनी चौकात उभे राहून केवळ वाहतूक नियमनाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सहपोलीस आयुक्तांनी केल्या आहेत. त्यामुळे आजवर दुर्लक्षित झालेल्या आणि मोकळ्या सुटलेल्या वाहतूक शाखेला लगाम बसल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर वाहतूक शाखेविरोधात आलेल्या गंभीर तक्रारींची चौकशी आता विशेष शाखेतील वरिष्ठांकडून करण्यात येणार आहे.

वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात असलेल्या पुणे शहरात नागरिकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. यातच शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नियमनाऐवजी एका कोपऱ्यात थांबून दंडवसूलीला प्राधान्य दिले जात होते. 

अनेकदा घोळक्याने चार ते पाच पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी आडबाजूला थांबून कारवाई करत असल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई होऊ शकलेली नाही. 

विशेषतः  ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्यासाठी असलेल्या टोइंग वाहनांबाबत नागरिकांची नाराजी होती. टोईंग वाहनावर असणार या खासगी व्यक्तींकडून टोइंगचे बेकायदा शुल्क वसूली, वाहनचालक पावती करीत असेल, तर चिरीमिरीसाठी जबरदस्ती करणे, गाडी उचलणारया तरुणांची अरेरावी आणि त्यांच्याच हाती दंडात्मक कारवाई करण्याचे मशीन बेकायदा सोपविण्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांविरोधात वाढत आहेत. 

या प्रकारांविरोधात तक्रार आल्यानंतरही कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व तक्रारींच्या पार्श्वभूमीवर  सहपोलिस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना केवळ वाहतूक नियमन करण्याचा आदेश दिला आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक करवाई करू नये, अशी सूचना वाहतूक शाखेला दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, कारवाईला लगाम घालण्यात आला असला तरी बेदरकार आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या तसेच वाहतूकीला अडथळा ठरणारया वाहनांची चित्रीकरण करून त्या वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामूळे बेशिस्त वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत.