मुंबई : राज्यात मान्सूनच्या सरी बरसण्यास सुरूवात झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. बीड, जालना, नाशिकसह दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य तुफान पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबामधली ही पावसाची दृश्यं आहेत. अचानक आष्टी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला..यामुळे या भागातील छोटे-मोठे नदी आणि ओढ हे ओसंडून वाहू लागले तर आणि ठिकाणी पूल रस्ते खचून गेलेत..अचानक ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
जालना जिल्हयात पावसानं जोरदार हजेरी लावलीय. जालना तालुक्याबरोबरच जाफ्राबाद आणि भोकरदन तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागात पहिला पाऊस झाल्यानंतर नागरीकांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती.
नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे आठवडे बाजारात भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. व्यापा-याचा खळ्यावर साठवलेला मका पूर्णपणे भिजला. व्यपा-याचं यात मोठं नुकसान झालयं.
नाशिकच्या सटाणा तालुक्यात धुवाँधार पाऊस पडलाय. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं. शेत शिवारातही पाणीच पाणी झालं. या पावसानं नदी-नाले भरून वाहु लागलेत. रस्त्यावर पाणी आल्यानं वाहनांना पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत होती. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर असल्यानं बळीराजा सुखावलाय.
पुणे शहर आणि परिसरातही रविवारी पावसाने हजेरी नोंदवली. थोड्याच कालावधीत भरपूर पाऊस झाल्याने पुण्यातील रस्ते जलमय झाले होते.