एका रात्रीत मतदानाचा टक्का कसा वाढला? सेनेचा सवाल

पालघरच्या मतदानाची आकडेवारी १२ तासांत ८ ते ९ टक्क्यांनी कशी वाढते?

Updated: May 30, 2018, 05:30 PM IST

पालघर  : पालघरच्या मतदानाची आकडेवारी १२ तासांत ८ ते ९ टक्क्यांनी कशी वाढते, असा सवाल शिवसेनेनं केलाय.  मतदान संपल्यानंतर रात्री आठ वाजता सरकारकडून ४६ टक्के इतका मतदानाचा आकडा जाहीर करण्यात आला... आणि बारा तासांनी मतदानाचा टक्का ५२ टक्क्यांवर कसा गेला? असा सवाल संजय राऊतांनी केलाय... 

'आता वेळ निघून गेलीय'

त्याचबरोबर नितीन गडकरी आमचे प्रिय आहेत. पण आता युतीची वेळ निघून गेलीय, हे त्यांनाही माहीत आहे, असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी... नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. आमचे प्रिय आहेत पण त्यांनाही माहीत आहे की वेळ निघून गेलीये हे सगळं करण्याची. जेव्हा काही गोष्टी करायच्या होत्या तेव्हा सगळेच घोड्यावर होते. सगळ्यांचे घोडे भरधाव सुटले होते. आता घोड्याला लगाम लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी अनेक गोष्टी अशा आहेत जे सुटलेले बाण आहेत. गडकरींनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. ते पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना ज्यांनी त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले याच लोकांनी शिवसेनेसंदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षात भूमिका घेतली त्यामुळे ही वेळ उद्भवली आहे. 

त्याचबरोबर प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला जाणार असकील तर त्यात गैर काय? असाही सवाल त्यांनी केलाय. पालघरमध्ये शिवसेनाच विजयी होणार, असा दावा करत संजय राऊतांनी चौफेर टोलेबाजी केलीय.