CM Eknath Shinde Lead Government: उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी कंत्राटदारांच्या मुद्द्यावरुन राज्यातील सत्ताताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत टीका करतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा उल्लेख करत त्यांनी गणपतीच्या काळात रस्ते मार्गाने कोकणात जाऊन पहावं म्हणजे या मार्गावरील किती काम राहिलं आहे हे त्यांना समजेल असं आदित्य म्हणालेत.
"गेल्या दीड दोन वर्षात जी लूट सुरु आहे ते आपण पाहत आलो आहोत. 15 जानेवारी 2023 ला मी पत्रकार परिषद घेतली आणि रोड स्कॅम समोर आणला होता. आता जुलै 2024 सुरु आहे. अजूनही काम झालेलं नाही. यात दक्षिण मुंबईतील कंत्राटदाराने काम केलं नाही म्हणून त्याला काढलं की ब्लॅक लिस्ट केलं? दंड लावला तो वसुल केला का? हा प्रश्न समोर येतो," असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
"कोकणात आता लोक गणपतीला जातील. मी गडकरी यांना सांगतो तुम्ही एकदा गाडीने जा. तुम्हाला कळेल किती काम झालं आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचं काम अजूनही सुरु झालेलं नाही. त्याचीही किंमत वाढवली गेली आहे. तीन सरकारे बदलूनही एक गर्डर बसलेला नाही. या मुख्यमंत्र्यांचे वैशिष्ट्य म्हणजे काम झाले नाही तरी प्रकल्पाची किंमत मात्र वाढतेच" असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
नक्की वाचा >> 'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार
"नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार आल्यावर आम्ही या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट थांबवणार आहोत. आम्ही हे काम थांबवणार आहोत. त्यावेळी जो कोणी हा घोटाळा करताय त्याला आम्ही जेलमध्ये टाकू. मंत्री मिंदे गटाचा असेल त्यालासुद्धा जेलमध्ये जावं लागेल," असा इशारा आदित्य ठाकेरंनी दिला आहे.
"अगाऊ पैसे या मिंदे सरकारने दिले आहेत. परत 6 हजार कोटींचे कंत्राट दिले आहे. तेच आवडते 5 कंत्राटदार आहेत. या कॉन्ट्रॅक्टरला मदतनिधी दिला जातोय. ब्लॅक लिस्ट झालेल्या कॉन्ट्रॅक्टरला काम कसं दिलं जातंय?" असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> 'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका
"लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना राज्यात सुरु आहे. काम होवो न होवो कॉन्ट्रॅक्टमध्ये इसकेलेशन झालेला पहियला मिळतंय. सध्यातरी 'सरकारचे खोके, जनतेला धोके' हे धोरण सुरु आहे. दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त करू असा मुख्यमंत्री म्हणाले होते त्याचा काय झालं?" असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
"राज्य सरकारने गाजर बजेट दाखवलं आणि दुसरीकडे भोपळा बजेट दिलं. त्यात मुंबईला काहीच मिळालं नाही," अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे. बजेटच्या दिवशीच आदित्य ठाकरेंनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा साधा उल्लेखही केला नव्हा अशी टीका केली होती.