मुंबई : Maharashtra Political Crisis : राजकीय आकसातून समर्थकांची सुरक्षा काढली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. याला प्रत्युत्तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. राज्यातील कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत, अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी आरोप करताना आमच्या कुटुंबीयांना काही झाल्यास मुख्यमंत्री, शरद पवार, आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, असे म्हटले होते. तसेच शिंदेने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. हे पत्र ट्विटही केले होते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता होती. मात्र, गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत याला प्रत्युत्तर दिले आहेत. शिंदे यांनी केलेले आरोप खोटे आहेत. राज्यातील कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढलं नाही. मुख्यमंत्र्यांनी संरक्षण काढण्याचे आदेश दिले नाहीत. ट्विटरवरुन केले जाणारे आरोप दिशाभूल करणारे आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवली आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. @Dwalsepatil
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 25, 2022
कोणाचीही सुरक्षा काढण्याचे आदेश गृह विभागाने दिलेले नाहीत. उलट या सर्व आमदारांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. काही विधानसभा सदस्य इथे नसतील, तर सेक्युरिटीचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसणार नाहीत. ते ऑफिसला जाऊन दुसरे काम करतील. त्यामुळे जाणीवपूर्वक कुणीही काही करत नाही. यात राजकारणाचा भाग नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही आमची जबाबदारी आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.