Amit Shah on Maharashtra Assembly Election: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांचं महाराष्ट्रात भव्य स्वागत करण्यात आलं. अमित शाह यांनी आज सर्वात स्वामी नारायण इथल्या योगी सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन काम करण्याचं आवाहन केलं. तसंच 2029 मध्ये एकट्या भाजपाच्या जीवावर सरकार बनवायचं आहे असं मोठं विधान अमित शाह यांनी केलं आहे. 2024 मध्ये युतीचे सरकार असेल, मात्र 2029 मध्ये शुद्ध रुपानं कमळाचं सरकार आणायचं आहे असं अमित शाह म्हणाले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. शक्ती कार्यकर्त्यांची - प्रचिती आत्मविश्वासाची टॅगलाईन खाली भाजपकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर अमित शाह मुंबई, ठाणे आणि कोकण मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
लोकसभेत (LokSabha) 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते अशी आठवण सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन असा शब्द देत असल्याचं विधान केलं आहे. "निराशेला गाडून कामाला लागा. लोकसभेत 2 जागा आल्या तेव्हा कुणीही पक्ष सोडून गेले नव्हते. मी शब्द देतो महाराष्ट्र भाजप महायुतीचे सरकार स्थापन करेन," असा निर्धार अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
1.20pm | 1-10-2024Mumbai | दु. १.२० वा. | १-१०-२०२४मुंबई.
Extended a heartfelt and warm welcome to Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, as he arrived in Mumbai.
आमचे नेते, मा. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितभाई शाह यांचे मुंबई येथे आगमन झाले.… pic.twitter.com/QWSyKR2xTX— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 1, 2024
"महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे. 60 वर्षात महाराष्ट्रात सलग तीनदा एकही पक्ष निवडणूक जिंकलेला नाही. आपण महान भारताच्या रचनेसाठी राजकारणात आलो आहोत," असंही अमित शाह म्हणाले. राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचं राजकारण म्हणजे मूर्खपणा आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली.
भपकेबाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही असं सांगत दिखावा करणाऱ्या आमदार आणि नेत्यांना अमित शाह यांनी खडसावलं. मतं वाढवल्याशिवाय निवडणूक जिंकता येणार नाही. म्हणून मतदानाचा आकडा वाढवण्यासाठी प्रयत्न करा. मतदार नसलेल्या घटकांना भाजपशी जोडा. प्रत्येक घरात वाद असतातच, मात्र हे वाद आणि मतभेद विधानसभेपुर्वी दूर करा. काहींना कामं करायची नसतात पण खरा कार्यकर्ता काम करताना विचार करत नाही असं सांगत त्यांनी भाजपातील पक्षांतर्गत वादावर परखड भाष्य केलं.
जे सरकार काम करते तेच निवडणुक जिंकतात. निराशा झटकून टाका, कुणीही सर्व्हेचा विचार करू नका. राज्यात भाजपाचं सरकार येईल त्यासाठी जोमात आणि शुद्धीत राहून काम करा. यंदा महायुतीचे सरकार येईल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा पुनरुच्चार अमित शाह यांनी केला.
दादरच्या योगी सभागृहात झालेल्या संवाद मेळाव्यास अमित शाहांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही सतिष, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समिती प्रमुख रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मुंबई कोअर कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.