अमरावतीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे सर्वाधिक प्रमाण

आतापर्यंत कोरोनाचे ३० टक्के रुग्ण दगावले

Updated: Apr 27, 2020, 01:01 PM IST
अमरावतीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे सर्वाधिक प्रमाण title=
फोटो अक्षय इंगोले

अनिरुद्ध ढवळे, अमरावती :   जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसवर अजून लस तयार झालेली नाही. त्यामुळे हा रोग रुग्णाला क्वारंटाईन करूनच बरा होतो. या जीवघेण्या व्हायरसमधून बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. भारतातही उपाययोजनांमुळे मृत्युदर कमी आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तरीही मृत्युदर कमी ठेवण्यात यंत्रणेला यश आले आहे. मात्र अमरावतीमध्ये मृत्यूचं प्रमाण धक्कादायक असून ते ३० टक्क्यांवर गेले आहे.

अमरावतीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमरावतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजे आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या सरासरी ३३.३३ टक्के रुग्ण दगावले आहेत. ही सरासरी देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे.

काय आहे मुंबई, पुण्याचा सरासरी मृत्यूदर?

अमरावतीचा कोरोना मृत्यूदर राज्यात सर्वाधिक आहे. नाशिकमध्ये हा सरासरी मृत्यूदर ९.६१ इतका आहे. नाशिकमध्येही मालेगावात मृतांचं प्रमाण मोठं आहे. पुण्यातील मृत्यूदर ७.२२ इतका आहे. तर मुंबईत तो ३.७७ इतका आहे. ठाण्यात १.९८ इतका आहे. त्या तुलनेत अमरावतीत कोरोना मृतांची सरासरी संख्या खूपच अधिक आहे.

अमरावतीत मृत्युदर का अधिक?

धक्कादायक बाब म्हणजे अमरावतीत सात पैकी सहा रुग्ण कोरोनाचे होते हे त्यांच्या मृत्युनंतर स्पष्ट झालं. कारण त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मृत्युनंतर प्राप्त झाला. म्हणजे या रुग्णांनी वेळीच उपचार करून घेतले नाहीत किंवा वेळीच रुग्णालयात दाखल झाले नाहीत असे दिसून येते. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, त्या भागात प्रशासनाला पुरेसं सहकार्य मिळत नसल्याचं दिसत आहे. कोरोनाची लक्षणं दिसताच स्वतःहून पुढे येण्याचं आवाहन प्रशासनाने केले असले तरी लोक वेळीच पुढे येत नाहीत. अमरावतीत कोरोना संशयास्पद रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आलेल्या अहवालात रुग्ण कोरोनाबाधित होता हे स्पष्ट झालं.

अमरावती शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्यानं वाढत आहे. शहरातील हैदरपुरा, हाथीपुरा, बाबा चौक, नुराणी चौक, तारखेडा, पाटीपुरा, पठाण चौक, लालखडी परिसर, खोलापुरी गेट या भागांना कोरोना हॉटस्पॉट घोषित केले आहे. वारंवार आवाहन करूनही लोक घराबाहेर निघत आहेत. त्यामुळे या भागात एसआरपीचे जवान तैनात करण्याची मागणी केली जात आहे.

अमरावतीत २ एप्रिलला पहिल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आणि ४ एप्रिल रोजी त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो कोरोनाबाधित होता हे स्पष्ट झालं. त्यानंतर कोरोना वेगवेगळ्या भागात फैलावत गेला. अलिकडेच पठाणपुरा चौकात फळविक्री करणाऱ्या ५८ वर्षीय विक्रेत्याचा कोरोनामुळे बळी गेला. तो मूळचा नांदुरा पिंगळाई या ग्रामीण भागातील राहणारा होता. पण महिनाभर तो गावी फिरकला नव्हता.

 

अमरावतीमध्ये आतापर्यंत आढळलेल्या २१ पैकी ७ रुग्ण दगावले आहेत. तर १० जणांवर उपचार सुरु आहेत. तर चौघेजण कोरोनामुक्त झाले आहेत.