रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड

कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर आणि चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 18, 2017, 12:38 PM IST
रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड title=
संग्रहित छाया

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर आणि चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवल्याचे दिसून येत आहे.

उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला तर काँग्रेसला लांजा, मंडणगडमध्ये खातेही उघडता आलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची पिछेहाट आणि काँग्रेसची अवस्था वाईट झालेय. १५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. सुमारे ९७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे. खेडपासून ते अगदी राजापूरपर्यंत सर्वच तालुक्‍यात सेनेच्या उमेदवारांनी मजल मारली.

रत्नागिरीत भाजप - ६, राजापूर -१, चिपळूण -४, गुहागर-३ तर संगमेश्वरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. संगमेश्वरमधील कोंडगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने कब्जा केलाय. या ठिकाणी शिसेनेला मोठा फटका बसलाय. या ठिकाणी १३ सेनेला तर भाजपला १२ ठिकाणी सरपंच पदाचा मान मिळालाय. तर खेड, मंडणगड आणि दापोली येथे विद्यामान राष्ट्रवादीचे आमदार असताना चांगले यश मिळवता आलेले नाही. केवळ खेडमध्ये ३ ठिकाणी यश पदरात पाडता आले. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला दिसत आहे.

उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्‍यांमध्ये राष्ट्रवादीने प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र, राष्ट्रवादीला यश संपादन करता आलेले नाही. खेड, दापोलीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश याने चांगलेच यश मिळविले. तेथे दहा ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला. मंडणगडात तेरापैकी दहा ठिकाणी सेनेचे सरपंच बसले. तसेच गाव पॅनेलचे बऱ्यापैकी सरपंच निवडून आलेत.

रत्नागिरी तालुक्‍यातील २९ पैकी २३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच सरपंच, तर सहा ठिकाणी भाजपने दावा केला. तसेच २४४ पैकी १९३ सदस्यांच्या जागांवर शिवसेनेने, ५१ जागांवर भाजपने दावा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत ताब्यात घेता आलेली नाही. खेडमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडे सात ग्रामपंचायती आल्या. राष्ट्रवादीकडे तीन ग्रामपंचायती आल्या आहेत. राजापूर २५ पैकी १७ शिवसेना, १ राष्ट्रवादी, १ काँग्रेस, ६ गाव पॅनेल, भाजपला एकही जागा मिळाली नाही. 

संगमेश्‍वरात ३५ पैकी १३ ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. या तालुक्‍यात भाजपने  मुसंडी मारली असून १२ सरपंचपदांवर दावा केला आहे. मात्र १० ठिकाणी गाव पॅनेलची सत्ता आहे. चिपळूण शिवसेनेला फटका बसलाय.

लांजा तालुक्‍यात १९ पैकी १५ शिवसेनेला मिळाल्या असून काँग्रेस ३ आणि गाव पॅनेलकडे १ ग्रामपंचायत आहे. लांजा-राजापूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीला जागा मिळविता आली; पण भाजपला खाते खोलता आलेले नाही. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या गुहागरमध्येही भाजपने ३ ग्रामपंचायती पटकावून चांगलाच दणका दिला. तेथे सेनेनेही २ ग्रामपंचायती राखल्या असून राष्ट्रवादीकडे २ ग्रामपंचायती आहेत.