MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 23, 2023, 08:05 PM IST
MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ title=

MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ४०८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज भरु न शकलेल्या उमेदवारांना आता आणखी एक संधी देण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीकरिता म्हाडाकडून या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली.  इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना10 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाइन भरता येणार आहे. तसेच  12 जुलै 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. 17 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. 

19 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. 24 जुलै 2023 रोजी दुपारी तीन वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार असून सोडतीचा दिनांक व वेळ नंतर जाहीर करण्यात येणार आहे.  

22 मे रोजी दुपारी 3वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून अर्जदारांचा सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1947 सदनिकांचा समावेश आहे तर 1795 सदनिका म्हाडा योजनेतील आहेत तसेच विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत 139 सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या 75 सदनिका , विकास नियंत्रण नियमावली 33 (7) अंतर्गत 25 सदनिका तर 102 विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. तसेच उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790, अल्प उत्पन्न गटासाठी 1034, मध्यम उत्पन्न गटासाठी 139 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 120 सदनिका आहेत. 

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS)वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपयापर्यंत  आवश्यक आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG)कमाल उत्पन्न मर्यादा नाही. उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.  

प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे. सोडतीत विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत प्राप्त सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33 (5) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका, मुंबई मंडळांतर्गत विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे.   

सदनिका विक्रीकरिता मंडळाकडे निश्चित साचेबद्ध कार्यप्रणाली कार्यरत आहे.  मंडळाने सदनिकांच्या विक्री करिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतींनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टी एजंट / मध्यस्थ/ दलाल म्हणून नेमलेले नाही अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास  मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. नागरिकांना असेही आवाहन करण्यात येत आहे की त्यांची अशाप्रकारे कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी म्हाडाच्या मुख्य दक्षता व  सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे.