प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : तुम्ही सुट्टीसाठी (Leave) कधी अर्ज केलात आणि तो बॉसने नाकारला तर तुम्हाला राग नक्कीच येत असेल. पण काही प्रामाणिक कारणांसाठी तुम्ही सुट्टीचा अर्ज करता आणि तो नाकारला जातो तेव्हा संताप नक्कीच होतं. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याने (gondia police) सुट्टीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र तो नाकारण्यात आला. त्यानंतर आता या सुट्टीच्या अर्जाची (Medical Leave) प्रत व्हायरल होत आहे. मात्र या अर्जाच्या पत्रापेक्षा अधिकाऱ्यांनी तो का नाकारला याचीच सध्या जास्त चर्चा सुरुय.
गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालयाचा एक विचित्र प्रताप पहायला मिळाला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने कुत्रा चावल्यानंतर उपचारांसाठी सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र चावलेला कुत्रा हा पिसाळलेला आहे का हे आधी सिद्ध करा आणि नंतरच उपचारासाठी रजा टाका असा फतवा चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षकाने काढला आहे. त्यामुळे रजा मंजूर करण्यासाठी चावलेला कुत्रा पिसाळलेला आहे हे सिद्ध करण्याची पंचाईत त्या पीडित कर्मचाऱ्यावर आली आहे.
जिथे कुणी जायला बघत नाही, तिथे पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असतात. यावेळी अनेकांना प्रसंगी दुखापतही होते. रात्री-बेरात्री गस्तीवर असताना मोकाट कुत्रे मागे लागतात. अनेकदा ते चावतातही. गोंदिया पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला पाच दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता. गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. त्यानंतर या पोलिसाने विशेष रजेसाठी अर्ज केला. त्याच्या अर्जाला जिल्हा पोलिस कार्यालय अधीक्षकांनी काहीसे रंजक उत्तर दिले.
कुत्रा चावलाय हे स्पष्ट होत नाही...
"कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचान्याला पिसाळलेल्या श्वानाने दंश घेतला असेल तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय (मंजूर) आहे. मात्र तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र (पिसाळलेला कुत्रा चावल्याचे) सोबत जोडलेले नाही," असे म्हणत अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत पाठवला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यासमोर बिकट अवस्था निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे या उत्तराचे पत्र व्हायरल झाल्याने पोलिस बॉईज संघटना आक्रमक झाली आहे. पोलीस कर्मचारी 24 तास आपली ड्यूटी बजावत असताना सतत ते ताण तणावात जगत असतात. कर्तव्यावर असताना एखाद्या वेळेच त्यांना उपचाराची गरज पडली तर आपली हक्काची सुट्टी मिळविण्यासाठी अशी तारेवरची कसरत करावी लागत असेल तर हे चुकीचे असल्याची टीका पोलीस बॉईज संघटनेने केली आहे. दुसरीकडे हे पत्र प्रचंड वायरल होत असून त्यांच्यावर लोकांकडून मजेशीर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहे. "कुत्रा तुम्हाला चावला तर लगेच त्याला पकडून जागेवरच विचारा...! नाही, तर कुत्र्याला दवाखान्यात घेऊन जा. आधी त्याची तपासणी करा (तो पिसाळला आहे की नाही म्हणून!) नंतर स्वतःवर उपचार करा. त्यानंतरच सुटीचा अर्ज सादर करा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहेत.