HSC Exam : बोर्डाच्या परीक्षांसाठी शिक्षण मंडळही झालं 'हायटेक'; पेपरफुटी थांबवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

HSC Exam : बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असून 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात परीक्षा होणार आहे. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

Updated: Feb 10, 2023, 02:42 PM IST
HSC Exam : बोर्डाच्या परीक्षांसाठी शिक्षण मंडळही झालं 'हायटेक'; पेपरफुटी थांबवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल title=

विष्णु बर्गे, झी मीडिया, बीड : दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी (HSC SSC Exam) आता काहीच दिवस उरले आहेत. विद्यार्थ्यांसह बोर्डाकडूनही (Board Exam 2023) परीक्षांसाठी तयारी केली जात आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेसाठी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. दुसरीकडे या परीक्षांमध्ये गैरप्रकार (cheating) टाळण्यासाठी औरंगाबाद शिक्षण विभागाने अनोखी योजना शोधून काढली आली आहे.

गैरप्रकार टाळण्यासाठी नवी शक्कल

राज्यभरामध्ये अवघ्या काही दिवसांवरच बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत‌ त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण विभाग आता कामाला लागला असून विद्यार्थी देखील परीक्षेची तयारी दिवस रात्र करताना दिसून येतायत मात्र यावर्षी परीक्षेमध्ये काही गैरप्रकार घडू नये म्हणून बोर्डाने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. पेपरफुटीला ब्रेक लावण्यासाठी यासाठी औरंगाबाद शिक्षण विभागाने नवी शक्कल लढवली आहे. आता परीक्षा केंद्रावर पेपर घेऊन जाणाऱ्या गाडीवर जीपीएससह कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे. औरंगाबाद बोर्डाचे सहाय्यक सचिव यांनी ही माहिती दिली आहे. कॉपी बहाद्दर केंद्रांवर चाप बसावा यासाठी ही उपाययोजना केली जाणार आहे. पेपरफुटीचा प्रकार टाळता यावा यासाठीची पेपर घेऊन जाणाऱ्या वाहनावर जीपीएस प्रणाली लावण्यात येणार आहे.

भरारी पथकांची नजर

कोरोना काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत सवलती मिळाल्या होत्या मात्र कोरोनाचे सावट दूर झाल्यामुळे पूर्वी जशा परीक्षा पार पडत होत्या तशाच यावर्षी देखील परीक्षा पार पडणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये, 38 हजार 929 विद्यार्थी यंदा बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यामध्ये 101 रिक्षा केंद्र असणार असून 15 परिवेक्षकांची निवड देखील करण्यात आली आहे. यासह परीक्षा केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथकाची नजर देखील या परीक्षा केंद्रावर असणार आहे.

पेपर फोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर पाच वर्षांसाठी बंदी

कोरोना काळात, बारावीच्या विद्यार्थ्यांना होम सेंटर अर्धा तासाची वाढीव सवलत देण्यात आली होती. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ही सवलत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता जुन्या नियमांप्रमाणेच परीक्षा घेतली जाणार आहे. याशिवाय मोबाईल, किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न केला तर पाच वर्षांसाठी त्या परीक्षार्थ्याला अपात्र केले जाणार आहे.

पेपर घेऊन जाणाऱ्या गाडीवर जीपीएस यंत्रणा

गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत परिवेक्षक कार्यालयापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पेपर घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेपर घेऊन जाणाऱ्या वाहनांचे थेट लोकेशन हे शिक्षण विभाग आणि बोर्डाला, दिसणार आहे. यासोबत याचे शूटिंगदेखील करण्यात येणार आहे.

"कॉपीमुक्त परीक्षांसाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षांचे पेपर परिरक्षक कार्यालयातून सेंटरवर जाईपर्यंत जीपीएसच्या माध्यमातून लाईव्ह लोकेशन मिळवून त्याचे शूटिंग केले जाणार आहे. केंद्रावर गेल्यानंतरही सील उघडेपर्यंत त्याचे शूटिंग केले जाणार आहे. तणावमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षांसाठी प्रयत्न केले जात आहे," अशी माहिती औरंगाबाद बोर्डाचे सहाय्यक सचिव व्हाय एस दाभाडे यांनी दिली.