टेन्शन वाढवणारी बातमी! लसणाचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल! आता थेट फेब्रुवारी-मार्चपर्यंत...

Garlic Rate Today: मागील अनेक महिन्यांपासून लसणाचे दर चर्चेत असतानाच लसणाचे सध्याचे नवे दर पाहून सर्वसामान्यांना धडकी भरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. लसणाच्या दरांमुळे अनेक गृहिणींचं किचन बजेट कोलमडलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 6, 2024, 10:31 AM IST
टेन्शन वाढवणारी बातमी! लसणाचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल! आता थेट फेब्रुवारी-मार्चपर्यंत... title=
लसणाचे दर चढेच (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स, पीटीआय, फ्रीपिकवरुन साभार)

Garlic Rate Today: सामान्यपणे कांद्याच्या किंमतींची जोरदार चर्चा असते. मात्र यंदा लसणाने कांद्यालाही घाम फुटेल इतका दर काढला असून त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने लसणाच्या किंमतीने सातत्याने झेप घेत आता थेट 600 रुपयांची मजल गाठली आहे. घाऊक बाजारामध्ये लसूण प्रतिकिलो 300 ते 400 रुपये दराने विकत मिळत आहे. तर किरकोळ बाजारपेठेमध्ये लसणाच्या दरांनी 500 ते 600 रुपये प्रतिकिलोचे दर गाठले आहेत. 

अजून दोन-तीन महिने अशीच स्थिती

समोर आलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे यंदा बाजारामध्ये लसणाची आवक कमी झाली आहे. त्यामुळेच पुढील काही महिन्यांसाठी लसूण असाच चढ्या दराने विकला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही महिन्यांपासून सुरु असलेली लसणाच्या दरामधील ही वाढ अजून किमान दोन ते तीन महिने कायम राहणार आहे. म्हणजेच फेब्रुवारी ते मार्चपर्यंत लसणाचे दर खाली येणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लसूण व्यापाऱ्यांनीच ही माहिती दिली आहे.

अनेक गोष्टी महागल्या

अन्नपदार्थांना चव येण्यासाठी कांद्याबरोबरच प्रामुख्याने वापरला जाणारा घटक म्हणून लसणाचा वापर केला जातो. मात्र सध्याचे लसणाचे दर पाहता 'फोडणीत लसूण घालायचा की नाही' असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. सध्या दैनंदिन वापरातील अविभाज्य घटक असलेल्या हळद, आलं, मिरची, जिरं यासारख्या गोष्टींचे दरही गगनाला भिडले आहेत. 

...म्हणून थेट फेब्रुवारी-मार्चमध्ये दिसाश्याची शक्यता

गेल्या वर्षी पावसामुळे शेतमाल खराब झाला. तेव्हापासून लसणाचे दर वाढू लागले आणि ते चढतेच राहिले. गेल्या दीड वर्षापासून लसणाचे दर चढेच असल्याचं दिसत आहे. बाजारामध्ये लसणाचा तुटवडा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. आता थेट पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन माल बाजारामध्ये आल्यावर आल्यावर या किमती कमी होण्याची शक्यता, व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मध्य प्रदेशातून 9 ते 10 टेम्पो लसूण आला आहे.

पुण्यात थोडाफार दिलासा

मागील आठवड्याच्या तुलनेत यंदाच्या आठवड्यामध्ये पुण्यातील बाजारपेठेमध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, आले, फ्लॉवरची आवाक वाढली असल्याने त्यांच्या दरात घट झाली. शेवग्याच्या दरात वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मेथी, कांदापात, करडई, मुळे, चुका या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. कोथिंबिर, चाकवत, करडई, पुदिना, राजगिरा,अंबाडी, चवळई, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.