'चुगल्या करणाऱ्यांना पक्षात महत्त्व, हाताचा मटणाचा वास गेला असेल तर..'; ठाकरेंवर लेटरबॉम्ब

Sensational Letter Against Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena: शिवसेना पक्षामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत नसल्याचं आपल्याला जाणवलं आहे, असं या पत्रात म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2024, 11:42 AM IST
'चुगल्या करणाऱ्यांना पक्षात महत्त्व, हाताचा मटणाचा वास गेला असेल तर..'; ठाकरेंवर लेटरबॉम्ब title=
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमधून राजीनामा देत हल्लाबोल

Sensational Letter Against Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता शिल्पा बोडखे यांनी खरमरीत पत्र लिहित आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा चुगल्या चाहाड्या करणाऱ्यांना अधिक महत्त्व आहे, असं म्हणत आपला राजीनामा पत्रच बोखडे यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन पोस्ट केलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरेंचा थेट उल्लेख करत बोखडेंनी हल्लाबोल केला आहे.

ठाकरेंच्या शब्दाला किंमत नाही

"माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र..." असा मथळ्यासहीत बोखडेंनी आपला राजीनामा सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. 2 पानांचं राजीनामापत्र शेअर करताना बोखडेंनी आदित्य ठाकरेंना टॅग केलं आहे. "माझी 4 वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे. पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे," असं बोखडेंनी म्हटलं आहे. 

त्या दोघी ठाकरेंनाही जुमानत नाहीत

"मी शिवसेना पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामिणकपणे काम करत संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी सतत षड्यंत्र रचून वारंवार संघटना विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. मला वाटले शिवसेना पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरेंच्या शब्दांना किंमत आहे. मात्र आता मला कळले येथे विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत,' असं शिल्पा बोखडे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मनोहर जोशी म्हणालेले, 'राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात...'

मी राजीनामा द्यावा असे प्रयत्न

"मी अहोरात्र प्रामाणिकपणे पक्षाचं काम करत राहिले. विशाखा राऊत व रंजना नेवाळकर शिवसेना भवनात बसून षड्यंत्र रचत राहिला. मला सोशल मिडीयासंदर्भातील पदावर काम करायचे नाही म्हणून मी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना पत्र देखील पाठवले. मात्र विशाखा राऊत यांना मी काम करु नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं असे वाटत आहे," असा आरोप बोखडे यांनी राजीनामाच्या पत्रात केला आहे.

नक्की वाचा >> 'बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून..'; मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

चुगल्या चाहाड्या करणाऱ्यांना महत्त्व

"संघटना वाढवण्यापेक्षा षड्यंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. माझा पक्षात टिशू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद," असा खोचक टोलाही या पत्रात बोखडेंकडून लगावण्यात आला आहे. "पुढे कोणाचे असे राजकीय आयुष्य बर्बाद करु नका. नाहीतर कोणाताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभा राहणार नाही कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा चुगल्या चाहाड्या करणाऱ्या व षड्यंत्र करणाऱ्यांना जास्त महत्त्व आहे," अशा शब्दांमध्ये बोखडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

नक्की वाचा >> 'सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या...', मनोहर जोशींच्या निधनाने गडकरी भावूक; हळहळून म्हणाले, 'कुटुंब...'

हाताचा मटणाचा वास गेला असेलच...

"मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्या बद्दल दोघींचे देखील अभिनंदन! पुढे देखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत रहा! आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपूरात येऊन सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा," असा टोला हे पत्र शेअर करताना बोखडेंनी लगावला आहे.