किरण ताजणे, झी २४ तास, नाशिक : तुमच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट लावली आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. येत्या १ एप्रिलपासून नाशिक परिवहन विभाग वाहन चालकांसाठी नवी नियमावली लागू करणार आहे. नवी गाडी घेतली की आपल्या आवडत्या नंबरची मागणी करून, नंबर प्लेटवर चित्र-विचित्र प्रकारे आकडे लिहिले जातात. यासाठी वाहनधारक वाट्टेल तितकी रक्कम मोजायला तयार असतात. मात्र कायद्यानं अशा प्रकारच्या फॅन्सी नंबर प्लेट बसवणं गुन्हा आहे. मात्र हौशा-नवश्या वाहन धारकांकडून नियमांची पायमल्ली केली जाते.
मात्र, आता अशा वाहन धारकांना चाप बसणार आहे. कारण येत्या १ एप्रिलपासून नाशिक परिवहन विभाग फॅन्सी नंबर प्लेट वाहन धारकांविरोधात धडक मोहीम सुरु करणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी भरत कळसकर यांनी दिलीय.
नव्या नियमावलीनुसार येत्या १ एप्रिलपासून नव्या आणि जुन्या अशा सर्व वाहनांना हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसवणं अनिवार्य असणार आहे. यानुसार...
- सर्व वाहनांना नव्या नंबर प्लेट बसवणं अनिवार्य असेल
- दोन्ही बाजूच्या नंबर प्लेटला वेगळा रजिस्ट्रेशन कोड असेल
- नंबर प्लेट बसवल्यानंतर काढता येणार नाही
- नंबर प्लेटवर काळ्या, पिवळ्या रंगात आणि तिरक्या अक्षरात IND असं लिहिलेलं असेल
- ठराविक शैलीतच आकडे लिहिणं अनिवार्य असेल
वाहन चोरल्यानंतर नंबर प्लेट बदलून तिचा वापर केला जातो. मात्र, नव्या नियमावलीमुळे गाडी चोरीच्या घटनांना चाप बसेल. तर फॅन्सी नंबर, चॉईस नंबरच्या नावाखाली सुरु असलेला गोरखधंदा बंद होईल. त्यामुळे सर्वसामान्य वाहन धारकांना दिलासा मिळणार आहे.