मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावे लागेल - संभाजीराजे

मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.  

Updated: Sep 26, 2020, 06:12 PM IST
मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावे लागेल - संभाजीराजे  title=
Pic Courtesy : twitter @YuvrajSambhaji

नाशिक / सातारा : मराठा आरक्षणासाठी सर्वांना एकत्र यावंच लागेल, अशी गर्जना संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सातारा, कोल्हापूर छत्रपती एकत्रच आहेत, अशी ग्वाही यावेळी संभाजीराजे यांनी दिली. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावे लागेल अशी गर्जना संभाजीराजे यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून योग्य समन्वय साधला जात नसल्याची टीका राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्र यावं लागले. ही शेवटची लढाई आहे,  असे ते म्हणाले. आम्ही दोन्ही छत्रपती एकत्रच आहोत. सातारा आणि कोल्हापूर एकच आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, तीन ऑक्टोबर रोजी पुण्यात विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात दिली. 

यावेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्याबरोबर विनायक मेटे यांनी सविस्तर चर्चा केली. याभेटीनंतर विनायक मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी आज ही भेट घेतली. त्यांना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे, असे आवाहन केले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी होकार दिला.

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून संघटित लढा देण्याचे काम येत्या तीन ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल, त्या निर्णयाबरोबर मी असेन, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नसून स्वतः च्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यातील बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे. नेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे. या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही तर उद्रेक होईल, याला जवाबदार कोण? असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.