मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणं आवश्यक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्र्यांकडून  मराठवाड्यातील कोविड आढावा

Updated: Sep 26, 2020, 05:03 PM IST
मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणं आवश्यक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना  title=

मुंबई :  मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. त्यांचे दोन द्राव्य ( swab) घेण्याचे सांगितले.  आज मराठवाड्यातील कोविड आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अनेक सुचना केल्या. यावेळी  पालकमंत्री सुभाष देसाई, अशोक चव्हाण, राजेश टोपे, अमित देशमुख, नवाब मलिक आदी व्हीसीद्वारे सहभागी होते. 

ग्रेट ब्रिटनसारख्या देशात आता लक्षणे न दिसणाऱ्या पण पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. पण त्यांची दररोज चौकशी केली जाते. त्यांना त्रास होऊ लागल्यास रुग्णालयात दाखल केले जात आहे. आपल्याकडे होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन यांची गल्लत केली जात आहे. होम क्वारंटाईन केलेल्यांना आपण घरी जाऊ देतो. पण लक्षणे न दिसणारी अशी मंडळी बाहेर फिरू लागतात आणि त्यांच्यामुळे अन्य काहींपर्यंत विषाणू पोहचू लागल्याचे ते म्हणाले.

महत्वाचे मुद्दे 

जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. 

ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे. 

ब्रिटन आणि अन्य देशात आता पुन्हा बंधने घालणे सुरु करण्यात आले आहे. रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजले जात आहेत. पुढचे सहा महिने ही बंधने राहतील अशी शक्यताही आहे. 

त्यामुळे आपल्याकडे माझे कुटंब माझी जबाबदारी ही मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या मोहिमचा उद्देश स्वरक्षणाचा आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टर सोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधांची उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. 

विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत.

राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याच्या वाहतूकीबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने समन्वयन सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यानी सांगितले.

ज्याप्रमाणे केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढे राहील असे प्रयत्न करायचे आहेत. स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची. गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आङेत.

आपली ही माझी कुटुंब माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल असा विश्वास आहे. यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण यातून घेणार आहोत. लहानपणी आपल्याला आई-वडील बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुवा, स्वच्छतेची काळजी घ्या अशा सवयी लावत. त्यामुळे आता या सूचना ग्रामीण भागापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे.

 प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. ज्यामुळे भावी आपत्तीच्या नांदी असेल, त्यावर मात करता येईल. लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे हे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीनवशैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल. 

कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी नो मास्क नो एन्ट्री हे धोरण राबविणे सुरु केले आहे. मास्क नसेल तर दुकानात प्रवेश नाही. जो दुकानदार मास्क वापरणार नाही, त्याच्याकडूनही खरेदी नाही अशी भुमिका घेण्याचे लोकांना आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर माझे काय होईल म्हणून पुढे येत नाहीत. तर काही मला काही होत नाही म्हणून बेपर्वाईने वागतात. या दोन्हीतून आपल्याला मार्ग काढून विषाणू प्रसार रोखायचा आहे.

नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा

याआधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण जाणीवपुर्वक साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.