एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार

मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

Updated: Sep 30, 2017, 06:29 PM IST
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार title=

ठाणे: मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

हे दोघेही नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी मुंब्रा येथून सीएसटी लोकल पकडून कामावर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान हे दोघेही एल्फिस्टन रोड येथे उतरून परेलच्या दिशेने जात असतांना अचानक पुलावर चेंगराचेंगरी झाली अन त्या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला. 

या घटनेत मृत झालेल्या लोकांची यादी जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा दोघा मृत तरुणांच्या परिवारांना या घटनेबाबत कळवण्यात आले. ही घटना कळताच मुंब्रा येथे सर्वत्र शोककळा पसरली. मृत तरुणांच्या परिवारातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनी जेजे रुग्णालयाकडे धाव घेतली. 

दरम्यान, या घटनेत मृत झालेल्या दोघा तरुणांच्या परिवाराची आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेऊन सांत्वना केली. तर दोघा मृत तरुणांच्या परिवारातील प्रत्येकी एका सदस्यांना रेल्वेत नोकरी मिळावी अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे. लोकांना बुलेट ट्रेन नको तर सुरक्षित प्रवास हवाय अशी देखील टीका आव्हाड यांनी यावेळी केली.