अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात वीज वितरण महामंडळाचा ट्रान्सफॉर्मर स्कूल व्हॅनवर कोसळला आहे. गंगाबाई घाट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे विजेचे खांब आणि ताराही कोसळल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हा ट्रान्सफॉर्मर जीर्ण झाला होता.
स्कूल व्हॅनवर त्याच्या तारा पडल्या. मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नागपुरात अनेक ठिकाणी तकलादू झालेले ट्रान्सफॉर्मर आहेत. ज्याकडे वेळीच महावितरणनं लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.
त्यासंदर्भात स्थानिकांनी महावितरण, आमदारांकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची कुठलीही दखल घेतलेली दिसत नाहीय. आज हा ट्रान्सफॉर्मर कोसळला. दोन गाड्यांचं नुकसान झालं.
ट्रान्सफॉर्मर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडलीच आहे. पण तो आता दुरुस्त होईपर्यंत स्थानिकांची गैरसोय होईल असे देखील तेथील रहिवाश्यांनी सांगितलं आहे. कारण या परिसरात शालेय विद्यार्थी देखील राहतात. त्यांची या पुढील काही दिवसात गैरसोय होत असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागपुर प्रतिनिधी अमर काणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्युत ट्रान्सफार्मर जुनी झाली आहेत. गंगाबाई परिसरातील हा ट्रान्सफार्मर जुना झाला होता. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रार देखील केली होती. वेळीच याची पाहणी झाली असती तर हा अनर्थ टळला असता, असं देखील सांगण्यात आलं आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
विद्यार्थ्यांनी भरलेल्या या व्हॅनवर ट्रान्सफार्मर पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. पण आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि असे जुने झालेले ट्रान्सफार्मर हटवले जातील का? याकडे स्थानिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.