राष्ट्रवादीत फूट पडणार? अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याची मोठी ऑफर?

अजित पवारांनी सरकारमध्ये सामील व्हावं... केसरकरांची खुली ऑफर. तर दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, सगळ्यांनाच हवे असतात. सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Updated: Jun 16, 2023, 07:53 PM IST
राष्ट्रवादीत फूट पडणार? अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याची मोठी ऑफर? title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत फूट पडणार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा अधूनमधून सुरु असते. आता, चक्क अजित पवारांना सरकारमधील एका मंत्र्यानंच मोठी ऑफर दिली आहे. या ऑफरमुळे अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  यामुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी देखील चर्चा रंगली आहे.  

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. ही ऑफर आहे सरकारमध्ये सामील होण्याची. विरोधी पक्षनेतेपद भूषवणा-या अजित पवारांना थेट सरकारमध्ये घेण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा देखील यानिमित्ताने रंगली आहे. अजित पवारांसारख्या कार्यक्षम नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे. त्यासाठी सरकारमध्ये या, अशी थेट ऑफर केसरकरांनी दिली आहे.

शिंदे सरकारमधील बड्या मंत्र्यानं ऑफर दिल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का

शिंदे सरकारमधील बड्या मंत्र्यानं ही ऑफर दिल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी एकदम फिल्मी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले बच्चन आहेत. ते सगळ्यांनाच हवे असतात, अशी परफेक्ट डायलॉग डिलिव्हरी सुप्रियाताईंनी केली आहे.

खरं तर विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे नंतर सरकारमध्ये सामील झाल्याची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. विरोधी पक्षातून सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांची मोठी यादी आहे.  2005 साली नारायण राणे विरोधी पक्षनेते असताना ते विलासराव देशमुख सरकारमध्ये सामील झाले होते. 2014 साली एकनाथ शिंदे आधी विरोधी पक्षनेते होते... त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री झाले. 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते. विधानसभा निवडणुकीनंतर ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. 2019 च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षात असलेले अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सगळ्यांना धक्का दिला होता.

केसरकरांच्या ऑफरवर आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार?

केसरकरांच्या ऑफरवर आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याची उत्सूकता सगळ्यांनाच लागली आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातले अँग्री यंग मॅन... भूमिका सरकारमधली असो की विरोधी पक्षातली, ते नेहमीच राजकारणाचा सेव्हन्टी एमएम पडदा व्यापून टाकतात. त्यामुळं सत्ते पे सत्ता गाजवण्यासाठी राष्ट्रवादीत डॉन सारखे वावरणारे अजित पवार पक्षाची दीवार ओलांडून जंजीर तोडणार का, याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात आहेत.