बायकोने विचारले सोबत येऊ?, डॉक्टर चिडले, अंगावर फेकला गरम चहा

या प्रकारनंतर हे कृत्य करणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.

Updated: Aug 7, 2018, 12:50 PM IST
बायकोने विचारले सोबत येऊ?, डॉक्टर चिडले, अंगावर फेकला गरम चहा title=

ठाणे: ते दोघेही पतीपत्नी चांगले शिकलेले. दोघेही पेशाने डॉक्टर. पण, रविवारची सकाळ त्यांच्या जीवनात एक वेगळाच प्रसंग घेऊन आली. डॉक्टर पतींनी डॉक्टर पत्नीवर चक्क गरम चहा फेकला. ज्यात डॉक्टर पत्नी जखमी झाल्या. या प्रकारनंतर हे कृत्य करणाऱ्या डॉक्टर पतीवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसही आश्चर्यचकीत

ठाणे येथील वर्तकनगर येथे ही घटना घडली. तिने सांगितलेला प्रसंग पाहून क्षणभर पोलीसही आश्चर्यचकीत झाले. पण, संपूर्ण घटना ऐकल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. घडले असे, ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात राहणारे हे जोडपे. नेहमीप्रमाणे पती सकाळी चहा पीत होता. दरम्यान, डॉक्टरपत्नीने पतीला एका कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत विचारलं. पण, या प्रश्नाने पती महोदय इतके संतपले की, त्यांनी कपातील गरम चहा पत्नीच्या अंगावर ओतला. डॉक्टर पत्नी पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नोकरी करते. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३३७ आणि ५०६ अंतर्गतही डॉक्टर पतिविरुद्ध वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाला ११ वर्षे, २ अपत्ये

प्राप्त माहितीनुसार, साधारण ११ वर्षांपूर्वी या डॉक्टर पती-पत्नीचा विवाह झाला असून, त्यांना दोन अपत्ये आहेत. गेल्या काही काळापासून पती-पत्नींमध्ये सतत वाद होत असे. त्यामुळे पत्नीने पतीपासून घटस्फोट मिळावा यासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला आहे. जो न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, याशिवाय तिने पतीविरोधात २०१६ मध्ये अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे. असे असतानाच पुन्हा एकदा अंगावर चहा ओतल्याबद्धल पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.