आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद विकोपाला

Uday Samant vs Vinayak Raut : रत्नागिरीतील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदार यांच्यामधील वाद आता विकोपाला गेला आहे. 

Updated: Jul 12, 2022, 02:40 PM IST
आमदार उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील वाद विकोपाला title=

मुंबई / रत्नागिरी : Uday Samant vs Vinayak Raut : रत्नागिरीतील बंडखोर शिवसेना आमदार आणि खासदार यांच्यामधील वाद आता विकोपाला गेला आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर उदय सामंत यांनी पत्रातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सामंत शिंदे गटात सामील झाल्याने विनायक राऊत यांनी गद्दार म्हटलं होतं. त्यावरून सामंतांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो. याचे साक्षीदार राऊत आणि अनिल देसाई आहेत. पण, शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी काम करणारी काही माणसं तिथं होती. त्यांची नाव लवकरच जाहीर करेन, असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. तर शिवसेना संपवण्यात भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात अशी टीका करत गद्दाराला शिवसेनेमध्ये प्रवेश नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही. तसेच माझ्यावर ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे. त्यांना मी उत्तर देणार नाही. त्यांचा राग समजू शकतो. मात्र, कालांतराने आम्ही ही भूमिका का घेतली आहे, हे समजून येईल. मी शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेतच आहे, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर खासदार राऊत आणि सामंत यांच्यातील वाद पुढे आल्याने जिल्ह्यात शिवसेनेत गट पडल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, उदय सामंत समर्थक दोन पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कट्टर समर्थक उदय बने यांना पुढील कामाला लागा असा आदेश शिवसेनेतून देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात उदय बने हे शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.