Did Divas Cha Ganpati History: गणरायांचं अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात आज गणराय घरोघरी विराजमान झाले. मुंबई, पुण्याबरोबरच महाराष्ट्रामधील अनेक गावाखेड्यांबरोबरच देशभरातील अनेक ठिकाणी गणरायांचं आज आगमन झालं. गणरायांचा पाहुणचार करण्यासाठी सर्वांची लगबग सुरु आहे. मात्र त्याचवेळी अनेक ठिकाणांहून आलेल्या दीड दिवसांच्या गणरायांचा आशिर्वाद घेण्यासाठी कसं जाता येईल याचंही नियोजन अगदी वैयक्तिक पातळीपासून मित्रमित्रांच्या गटागटानेही सुरु आहे. मात्र असं नियोजन करताना अनेकदा अनेकांच्या घरी केवळ दीड दिवसांसाठीच गणराय का येतात? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचसंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत.
खरं तर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली. मात्र गणपती बाप्पा दीड दिवसांसाठी आणण्याच्या प्रथमेमागील मुख्य कारण हे शेतीसंदर्भातील आहे. दीड दिवसांच्या गणपतीसंदर्भात एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एक रंजक गोष्ट सांगितली होती. भारत हा कृषीप्रधान देश असून अगदी आजही बहुसंख्य जनता खेड्यांमध्येच राहते. भारतामधील प्रमुख व्यवसाय म्हणजेच उपजिविका ही शेतीवर अवलंबून आहे. याच शेतीच्या पिकं घेण्याच्या पद्धतीमध्ये भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीच्या आसपास शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केलेल्या धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून बाहेर येतात. याच कारणामुळे शेतकरी चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानतो. ही प्रथा फार जुनी आहे. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी शेताच्या बांधावरच शेतामधील मातीची छोट्या आकाराची मूर्ती तयार करून तिची मनोभावे पूजा केली जायची.
शेतातील मातीपासून बनवलेली ही मूर्ती पूजा केल्यानंतर त्याचदिवशी नदीत विसर्जित केली जायची. मात्र जसजशी वर्षे सरु लागली तसा या परंपरेत बदल होत गेला. हळूहळू अनेकजण मातीची सुबक मूर्ती खास तयार करून ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठापना करु लागले. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर तिचं विसर्जन करण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू दीड दिवसांच्या गणपती पूजनाचा पायंडा पडला.
याच परंपरेमधून शहरी भागांमध्ये आज रुळलेली दीड दिवसांच्या गणपती उत्सवाची पद्धत सुरु झाली. असं असलं तरी आजही अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं त्याच दिवशी विसर्जन करण्याची प्रथा कायम आहे. खास करून दक्षिण भारतामधील अनेक गावांमध्ये चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण आज खास करुन शहरांमध्ये धावपळीचं कारण देत दीड दिवसच गणरायांचा पाहुणचार करतात. पण धापळीऐवजी या दीड दिवसांच्या गणपतीमागील खरं कारण हे त्याचं शेतीशी संबंधित आहे.