विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या धक्क्यानंतर धनंजय मुंडे-रावसाहेब दानवे आमने-सामने

विधानपरिषद निवडणुकीत उस्मानाबाद-बीडमध्ये आज (सोमवार,७ मे) धक्कादायक घटना पहायला मिळाली.

Updated: May 7, 2018, 05:16 PM IST
विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या धक्क्यानंतर धनंजय मुंडे-रावसाहेब दानवे आमने-सामने title=

बीड : विधानपरिषद निवडणुकीत उस्मानाबाद-बीडमध्ये आज (सोमवार,७ मे) धक्कादायक घटना पहायला मिळाली. कदाचीत राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीतील ही अपवाद अशी घटना असावी. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रमेश कराड यांनी अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघी काही मिनिटं असताना अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता या निवडणूकीत राजकीय खळबळ उडलीय. रमेश कराड हे अगदी काही दिवसांपूर्वींच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत आले. त्यांना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं. पण आज कराड यांनी अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः धनंजय मुंडेंना मोठा झटका बसलाय.

मुंडे-दानवेंची झी २४ तासला प्रतिक्रिया

या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर धनंजय मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी झी २४ तासला प्रतिक्रिया दिली आहे. रमेश कराड यांनी उमेदवारी मागे घेतली हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर खरंच धक्का लागला का नाही हे कळेल, असं धनंजय मुंडे म्हणाले. तर कराड यांच्याशी आम्ही कोणतीही चर्चा केली नाही किंवा त्यांना कोणतंही आश्वासन दिलेलं नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले. कराड यांनी अर्ज मागे घेतला नसता तरी भाजप उमेदवार सुरेश धस यांचाच विजय झाला असता, असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला. दरम्यान रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी आता अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना पाठिंबा देणार आहे. धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.

कोण आहेत रमेश कराड?

रमेश कराड हे 12 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देऊन भाजपवासी झाले होते,गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांना २००९ आणि २०१४ मध्ये लातूर ग्रामीण मतदार संघातून भाजपने उमेद्वारी दिली होती. मात्र दोन्ही वेळा ते पराभूत झाले. कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ म्हणून परिचित आहेत. स्थानिक स्वराज्य संघातून त्यांनी भाजपला उमेदवारी मागितली होती मात्र भाजपने सुरेश धस याना पसंती दिल्याने कराड नाराज झाले. नाराज कराड याना गळाला लावत धनंजय मुंडे यांनी  त्यांना राष्ट्रवादी मध्ये प्रवेश दिला. पण, 'अती घाई संकटात नेई' या म्हणी प्रमाणे कराडांनी मुंडेंना ऐनवेळी अडचणीत आणले. उस्मानाबाद येथे धनंजय मुंडे,जीवनराव गोरे,राणा जगजितसिंह पाटील,अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत कराड यांचा प्रवेश आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोहळा पार पडला होता.