गजानन देशमुख, झी २४ तास, परभणी: पीक विम्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. ते शुक्रवारी परभणीच्या गंगाखेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की,
रब्बीचा विमा देणाऱ्या कंपन्यांवर मोर्चा काढायचा सोडून खरीपाचा पीक विमा देणाऱ्या कंपनीवर शिवसेनेने मोर्चा काढला होता. यामधून शिवसेनेचे शेतीविषयक ज्ञान आणि शेतकऱ्याबद्दलचा कळवळा साऱ्या महाराष्ट्राला दिसून आला होता.
आतादेखील शिवसेना आमच्यामुळेच शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाल्याचे सांगत आहे. मात्र, हप्ता भरलेल्या केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनाच ही रक्कम मिळाली आहे. त्यामुळे पीक विम्याच्या तुटपुंज्या मिळकतीचे श्रेय लाटणे म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई पत्रकारपरिषद घेतली होती. यावेळी त्यांनी पीक विम्यासंदर्भात शिवसेना पाठपुरावा करत असल्याचा दावा केला होता. केंद्र सरकारची पीक विमा योजना कंपन्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. मात्र, विमा कंपन्यांच्या कारभारामुळे ९० लाख शेतकरी या योजनेस अपात्र ठरले आहेत. त्यासाठी काय निकष लावले गेले हे तपासण्याची गरज असून सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, शिवसेनेने काढलेल्या मोर्चामुळे आणि खासदारांच्या पाठपुराव्यामुळे १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाल्याचा दावा उद्धव य़ांनी केला होता.