पुणे : नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशभक्तांनी यथाशक्ती दानपेटीत दान टाकले. असेच गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या दानपेटीमध्ये भाविकांनी साडेतीन कोटी रुपयांचे दान जमा केले आहे. त्यामध्ये चलनातून बॅड झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मिळून एकूण २५ हजार रुपये आहेत.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव नुकताच साजरा झाला. उत्सवकाळात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि मंडपामध्ये साकारलेल्या ब्रह्मणस्पती मंदिर येथे भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. भाविकांनी दानपेटीमध्ये साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे. तर गेल्या वर्षी हा निधी २ कोटी ९० लाख रुपयांचा होता.
नोटाबंदीनंतर यंदाच्या वर्षी रोख रकमेत तब्बल ६० लाख रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे गणपतीवरील भाविकांची श्रद्धा कायम असून नोटबंदीचा कोणताही परिणाम जाणवला नाही, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे आणि कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली. त्याचबरोबर उत्सव काळात भाविकांनी गणरायाच्या चरणी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या आभूषणांची अद्याप मोजदाद झालेली नसल्यामुळे त्याबाबत नेमकेपणाने सांगता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
राज्यभरातून येणारे अनेक भाविक दगडूशेठ हलवाई गणपतीला ५,११ किंवा २१ नारळांचे तोरण अर्पण करतात. यंदाच्या वर्षी भाविकांनी अर्पण केलेले नारळ सुमारे साडेसात हजार पोती भरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा एक हजार पोती नारळांची अधिक भर पडली आहे. नारळ विक्रीतून ट्रस्टला ६५ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत होते. उत्पादन कमी झाल्यामुळे या वर्षी नारळाच्या दरामध्ये वाढ झालेली असल्याने भाविकांना तोरणासाठी जादा रक्कम मोजावी लागली, अशी माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली.