तिसऱ्यांदा CM होणार फडणवीस! यापूर्वी दोघांनी केला हा पराक्रम; मात्र 4 वेळा CM झालेला नेता माहितीये का?

Maharashtra New Chief Minister: देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 5, 2024, 11:06 AM IST
तिसऱ्यांदा CM होणार फडणवीस! यापूर्वी दोघांनी केला हा पराक्रम; मात्र 4 वेळा CM झालेला नेता माहितीये का? title=
देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

Maharashtra New CM Oath Ceremony Intresting Facts And History: 'मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष शपथ घेतो की...' अशी शपथ वाचून पूर्ण होताच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाती घेतील. फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असले तरी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री होणाऱ्या यादीमध्ये ते केवळ सातवे व्यक्ती ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फडणवीसांपेक्षा अधिकवेळा मुख्यमंत्री होण्याचा मान केवळ एकाच व्यक्तीने मिळवला आहे. ही व्यक्ती कोण आणि कोणत्या सात जणांनी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे ते पाहूयात....

फडणवीस हे असे दुसरेच मुख्यमंत्री ठरले ज्यांनी...

फडणवीस यापूर्वी 2014 साली मुख्यमंत्री झाले. त्यांची ती शपथ ऐतिहासिक ठरली कारण ते राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरले होते. त्यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला होता. राज्याच्या इतिहासात वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस या दोनच मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांचा सलग कालावधी पूर्ण केला. उर्वरित 18 नेत्यांना पाच वर्षांचा सलग कालावधी मिळालेला नाही किंवा तो पूर्ण करता आला नाही.

सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिलेला नेता कोण?

2019 च्या सत्तासंघर्षादरम्यान महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणाऱ्या गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालं. मात्र त्यांचा हा कार्यकाळ अवघा साडेतीन दिवसाचा राहिला. त्यांनी साडेतीन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सर्वांत कमी साडेतीन दिवस मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रमही फडणवीस यांच्याच नावावर आहे. आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतील तेव्हा त्यांच्या पाठीशी त्यांच्याच पक्षातील 130 हून अधिक आमदारांचं पाठबळ असणार आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीसांना किती पगार मिळणार पाहिलं का? Per Month Salary थक्क करणारी

काका-पुतण्या, वडील-मुलगा दोघेही मुख्यमंत्री

महाराष्ट्रात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले वसंतराव नाईक हेच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. वसंत राव नाईक हे 1963 ते 1975 असे तब्बल 11 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या विलासराव देखमुखांचा क्रमांक लागतो. शरद पवार यांचा मुख्यमंत्रिपदाचा एकूण कार्यकाळ हा साडेपाच वर्षांचाच आहे. नात्यामध्येच मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्यांमध्ये वसंतराव नाईक- सुधाकरराव नाईक या काका-पुतण्याचा उल्लेख करावाच लागेल. तर महाराष्ट्रात अशीही पिता-पुत्राची जोडी आहे ज्यांनी दोघांनीही राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. या पिता-पुत्राची जोडी म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण!

सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री राहिलेला नेता कोण?

फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असले तरी त्यांच्यापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री झालेली एक व्यक्ती आजही सक्रीय राजकारणात आहे. या व्यक्तीचं नाव आहे शरद पवार! राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे सर्वाधिक चार वेळा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तर तीन वेळा मुख्यमंत्री होणारे फडणवीसांपूर्वी दोन नेते होऊन गेले आहेत. हे दोन नेते म्हणजे वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील! दोनदा मुख्यमंत्री होणाऱ्या नेत्यांच्या यादीत शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देखमुख यांचा समावेश आहे. 

नक्की वाचा >> सत्तेत कोणीही असो DCM एकच... अजित पवार आज नेमके कितव्यांदा उपमुख्यमंत्री होणार?

एकदाच मुख्यमंत्री झालेले नेते कोणते?

  • यशवंतराव चव्हाण
  • वामनराव कन्नमवार
  • पी. के. सावंत
  • बॅरिस्टर ए. आर. अंतुले
  • बाबासाहेब भोसले
  • शिवाजीराव निलंगेकर पाटील
  • सुधाकरराव नाईक
  • मनोहर जोशी
  • नारायण राणे
  • सुशीलकुमार शिंदे
  • पृथ्वीराज चव्हाण
  • उद्धव ठाकरे
  • एकनाथ शिंदे