फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम; दिल्लीत आज मोदी-शाहांना भेटणार?

 Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 6, 2024, 12:53 PM IST
 फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम; दिल्लीत आज मोदी-शाहांना भेटणार? title=
Devendra Fadnavis likely to go delhi and meet amit shah over he offers to resign as Maharashtra deputy CM

 Devendra Fadnavis News:  लोकसभा निवडणुकांचा निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. राज्यात भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी 9 जागांवर भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मला सरकारमधून मोकळं करा, असं म्हणत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. 

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांची मनधरणीदेखील केली होती. मात्र, आता हाती आलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असल्याचे कळतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळी काम करता यावे, यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे. 

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असून सरकारमध्ये राहून पक्षासाठी विधानसभेची तयारी करण्यावर मर्यादा येतील, त्यामुळं पद सोडण्यावर फडणवीस ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीस यांनी निर्णय बदलावा यासाठी काल अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली, परंतु फडणवीस यांचा निर्णय बदलण्यास नकार असल्याचे कळतंय. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपची राज्यातील संघटनात्मक ताकद मजबूत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांचे मत आहे.

दरम्यान, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच आज देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. भाजप नेतृत्वाची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीत बोलवण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ आज संध्याकाळी दिल्लीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तसंच, या बैठकीत महाराष्ट्र आणि युपी संदर्भात मंथन केलं जाईल.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. किंबहुना आमच्या पेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. त्याच्याशी आमची लढाई होती. हा नेरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही हे खर आहे. मविआला २ कोटी ५० लाख मतं आणि महायुतीला २कोटी ४८ लाख मतं मिळाली आहेत. 

मराठा आरक्षण दिल्यानंतरही नरेटिव्ह तयार करण्यात आला. त्याचा फटका मराठवाड्यात बसला. भाजपला महाराष्ट्रात जो सेटबॅक झाला आहे. त्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. मला सरकारमधून मोकळं करा, अशी मागणी फडणवीसांनी पक्षातील नेत्यांकडे केली आहे.