'अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ' हे ऐकताच फडणवीस म्हणाले, 'जो राजकारणात...'

Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: मुंबईमध्ये पत्रकारांनी फडणवीस यांना त्यांनी केलेल्या विधानावरुन प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 5, 2023, 01:15 PM IST
'अजित पवार CM होतील, फडणवीसांचं त्याला पाठबळ' हे ऐकताच फडणवीस म्हणाले, 'जो राजकारणात...' title=
अजित पवारांचा उल्लेख करत विचारण्यात आला फडणवीस यांना प्रश्न

Devendra Fadnavis On Chief Minister Post Ajit Pawar And Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका खासगी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करु असं विधान केलं होतं. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच फडणवीस यांनी या विषयावरुन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण स्पष्टपणे काय ते सांगितलं आहे असं म्हटलं आहे. मुंबईमध्ये तैवानमधील कंपन्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर फडणवीस यांची पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

फडणवीस त्या मुलाखतीमध्ये नक्की काय म्हणाले होते?

'इंडिया टुडे'च्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांना "अनेकजण असं म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा ते सांगतात की 6 महिने मला द्या. मी मुख्यमंत्री होऊन सर्व गोष्टी बदलून दाखवतो. अशाप्रकारचं काही आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे का?" असा प्रश्न विचारण्यात आला. "पहिली गोष्ट म्हणजे 6 महिन्यात काही गोष्टी बदल नाहीत. बनवलं तर त्यांना (अजित पवारांना'') पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू," असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यावर मुलाखतकाराने "तुम्ही अजित पवारांना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवाणार असं म्हणत आहात का?" असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी, "जेव्हा संधी मिळेत तेव्हा... आता तरी मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत," असं उत्तर दिलं. पुढे बोलताना फडणवीस यांनी, "लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवल्या जातात. तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री बदलले जाणार आहेत. मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत," असंही म्हटलं

पत्रकारांनी काय विचारलं?

याच मुलाखतीचा संदर्भ आणि शिंदेंच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याने केलेल्या विधानाचा आधार घेत पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री शिंदेंच्या कॅबिनेटमधील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केलेल्या दाव्यावरुन पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. "धर्मरावबाबा आत्राम यांनी असा दावा केला आहे की अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस यांचं त्याला पाठबळ आहे," असं म्हणत एका पत्रकाराने फडणवीसांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान अन्य एका पत्रकाराने फडणवीस यांना तुम्हीच काल एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात (अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात) भाष्य केलं होतं असंही म्हटलं.

नक्की वाचा >> 'राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या करुन...'; शरद पवारांबद्दल फडणवीसांचा गौप्यस्फोट

फडणवीस काय म्हणाले?

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी, "असं आहे की, जो जो राजकारणात आहे त्या प्रत्येकाला कुठे ना कुठे कधी ना कधी संधी मिळणार आहे. अजित पवार त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. पण त्यासोबत या सर्वांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना एकत्रितपणे आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यामुळे कालही मी अतिशय क्लिअर बोललो. काही लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे," असं म्हटलं.

...म्हणून मुख्यमंत्री दिल्लीला गेले

राज्याचे मुख्यमंत्री अचानक दिल्लीला गेल्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, "नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यात येत आहे. त्यासाठी एकनाथराव शिंदे हे दिल्लीला आहेत," असं उत्तर दिलं.