Devendra Fadanvis Reply to Sharad Pawar: विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं. यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान महायुतीला मिळालेल्या मतांवर विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. यात ईव्हीएमचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. शरद पवार यांनीदेखील महायुतीला मिळालेल्या मतांबाबत शंका उपस्थित केली होती. याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
मोठी राज्य आहेत तिथे भाजप आणि छोटी राज्य आहेत तिथे आम्ही आहोत. मतांची आकडेवारी बघून आश्चर्य वाटतं. अजित दादा गटाची मत 58 लाख मत असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 80 लाख मत असताना त्यांचे 15 जण निवडून आले. निवडणूक निकालानंतर राज्यात उत्साह नाही, असे शरद पवार म्हणाले. महायुतीतील पक्षांना कमी मतं मिळून त्यांच्या जास्त जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीतील पक्षांना जास्त मत मिळून कमी जागा निवडून आल्या, याकडे पवारांनी लक्ष वेधले. याला फडणवीसांनी पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? सांगताना फडणवीसांनी गणित मांडले. 2024 लोकसभेत भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13 होत्या. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा होत्या. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्याचे गणित फडणवीसांनी मांडले. आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे फडणवीस म्हणाले. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, असे आवाहन फडणवीसांनी पवारांना केले.