Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राज्याच्या राजकारणातली या घडीची सर्वात मोठी बातमी. दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Group) मोठा दिलासा दिला आहे. मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे. समता पार्टीने दोन जजेसच्या बेंचकडे ही रिट याचिका केली होती.
ठाकरे गटाला मशाल चिन्हं न देण्याची विनंती समता पार्टीने केली होती. याआधी सिंगल जज बेंचने ही याचिका फेटाळल्यावर समता पार्टीन डबल जज बेंचकडे याचिका केली होती. आता डबल जज बेंचनेही याचिका फेटाळल्यामुळे मशाल चिन्हं ठाकरे गटाचंच यावर शिक्कामोर्तब झाले आहे. समता पार्टीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असता तर मुंबईतील पोटनिवडणुकीवर याचा परिणाम होण्याची चर्चा होती. मात्र, न्यायालयाने समता पार्टीची याचिका पुन्हा फेटाळल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. मुंबईतल्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलं. रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. ऋतुजा लटकेंविरोधात अपक्ष मिलिंद कांबळेंसह 7 अपक्ष रिंगणात आहेत. दरम्यान निवडणुकीतून माघार घेतलेल्या मुरजी पटेल यांनीही मतदान केलं. यावेळी त्यांनी ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत होऊ देऊ नका, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगाने (Election Commission) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला नवे चिन्हं मिळाले. मात्र, यावर समता पार्टीने आक्षेप घेतला होता. राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे तर मशाल हे चिन्ह आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं.