मुंबई : नाशिक शहरात सायबर गुन्ह्यांचा आलेख उतरायला लागलाय. गेल्या वर्षी मे महिन्यात सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जनजागृती मोहीमही हाती घेतली होती. आता सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात ८५ टक्के यश आले आहे. नाशिक शहरात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी लक्षात घेता मे 2017 ला स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. शहरात सुरूवातीला मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे दाखल होत असत. मात्र याबाबत विशेष पथक नसल्याने गुन्हेगारीचा आलेख चांगलाच उंचावला होता. यामध्ये सर्वात जास्त फसवणुकीचे आणि विनयभंगाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये मोबाइल वर आलेला OTP घेऊन फसवणूक केल्याचे समोर आलेय. तर सोशल मीडियाच्या तक्रारी या महिलांच्या जास्त प्रमाणात होत्या. यावर नियंत्रण आणण्यास नाशिक पोलिसांना यश येतांना दिसून येत आहे.
- बँकेतून कुठल्याही प्रकारे OTP मघितला जात नाही त्यामुळे OTP शेअर करू नका
- अज्ञान व्यक्तिला आपली खाजगी माहिती देऊ नका
- फसव्या जाहिरातींना बळी पडू नका
- ऑनलाइन खरेदी करतांना वेबसाईटची विश्वासहार्यता तपासून खरेदी करा
- सोशल मीडियावर मैत्री करतांना काळजी घ्या
- काही संशयास्पद प्रकार आढल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा
सायबर गुन्हे हे जटील असतात. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणाही सक्षम होणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाची मदत घेऊन चोर कशापद्धतीने फसवणूक करणार आहेत हे लक्षात घेणं पोलिसांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे पोलिसांनीही याबाबत एक पाऊल पुढे राहणं गरजेचं आहे.