Crime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना

Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) एका चपलेवरुन (Chappal) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांपत्याने केलेल्या हल्ल्यात वयस्कर व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली असून तिचा पती फरार आहे.   

Updated: Mar 6, 2023, 02:14 PM IST
Crime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना title=

Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) दांपत्याने वयस्कर शेजाऱ्याची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चपलेवरुन (Chappal) ही हत्या झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिला जैनब रुपानीला अटक केली आहे. दरम्यान तिचा पती समीर रुपानी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अफजर खत्री असं पीडित व्यक्तीचं नाव असून मारहाणीत झालेल्या दुखापतीनंतर त्यांनी जीव गमावला. अफजर यांनी आपल्या घराबाहेर चपला ठेवण्यास विरोध केल्याने त्यांच्यावर हल्ला करत हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफजर खत्री हे अस्मिता इमारतीमधील बी बिंगमध्ये वास्तव्यास होते. रात्री 8 वाजता ते कामावरुन परतले असता त्यांची पत्नी जैनबशी वाद घालत असल्याचं त्यांनी पाहिलं. अफजर यांनी चौकशी केली असता पत्नीने जैनबने आपल्या घराबाहेर चपला ठेवल्या असून त्या उचलण्यास नकार देत असल्याचं सांगितलं. यानंतर अफजर यांनी जैनबला जाब विचारला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, समीर रुपानी आणि अफजर यांच्यात मारहाण झाली. 

मारहाणीत अफजर खत्री गंभीर जखमी झाले. त्यांच्या संपूर्ण शरिरावर जखमांच्या खुणा होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शेजारी आणि कुटुंबीयांनी मध्यस्थी केली असता अखेर ही मारामारी थांबली आणि ते आपापल्या घरी गेले. 

"रविवारी अफजर खत्री टोमॅटो आणि फालूदा आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र घरी पोहोचताच ते खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. त्यांना तात्काळ लाइफलाइन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

"आम्ही जैनबला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा समीर घरी नव्हता, आम्ही त्याचा शोध घेत आहोत," असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.