कोरोना : राज्यातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले!

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Mar 24, 2020, 09:09 PM IST
कोरोना : राज्यातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! title=
संग्रहित छाया

नांदेड : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा फैलावर जास्त होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  त्याचवेळी कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. 

नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरुद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा विद्यार्थी चार महिन्यांपूर्वी इंटर्नशिपसाठी मॉरिशसला गेले होते. २४ मार्च रोजी ते भारतात परतणार होते. परंतु, विमानसेवाच रद्द झाल्याने ते मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांचा व्हिसा २५ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्र व्यवहार केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मॉरिशसमधील भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विमाने रद्द होत असताना त्यांनी परतीच्या तिकिटासंदर्भात संबंधित विमान कंपन्यांशी सुद्धा संपर्क साधला, मात्र तिथेही ठोस उत्तर मिळाले नसल्याची त्यांची तक्रार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

या अडकलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही  मदत मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या प्रश्नाचे गांभिर्य जाणून घेत चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून या विद्यार्थ्यांच्या अडचणी शासनाला कळविल्या आहेत. राज्य सरकारने देखील हा प्रश्न गांभिर्याने घेतला असून, या सहा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. त्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील असून, विमानसेवा पूर्ववत होताच त्यांना मायदेशी आणले जाईल. तोवर त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्वतःची काळजी घ्यावी आणि अडचण असल्यास केव्हाही संपर्क साधावा, या शब्दांत चव्हाण यांनी त्यांना दिलासा दिला आहे.