कोरोनाचा वाढता फैलाव : नवी मुंबई, पनवेल, रत्नागिरीत दुकाने बंद

 कोरोना फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबईसह पनवेल येथील दुकाने आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत.  

Updated: Mar 19, 2020, 09:07 PM IST
कोरोनाचा वाढता फैलाव : नवी मुंबई, पनवेल, रत्नागिरीत दुकाने बंद title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना व्हायरसचा होणारा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून नवी मुंबईसह पनवेल येथील दुकाने आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहेत. तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व हॉटेल्स दुकाने आणि आस्थापना बंद आहेत. जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप पुढील काळात सुरु राहतील त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याची गरज नाही. त्यांना पेट्रोल उपलब्ध राहील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सांगितले आहे.

बंदतून अत्यावश्यक सेवा वगळल्या

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे मोठी खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी हे सरकारच्यावतीने पाऊल उचलण्यात आले आहे. नवी मुंबई, पनवेल महापालिकेने ३१ मार्चपर्यंत फेरीवाले, खाऊ गल्ली, स्पा आणि इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सलून २५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बंदतून अत्यावश्यक  किराणा माल,  दूध - भाजी आणि मेडिकल सेवा वगळल्या आहेत.

मंदिरे,यात्रा-जत्रा, शाळा बंद 

राज्यामध्ये कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकार ने राज्यातील सर्व गर्दीचे कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले असून राज्यातील अनेक मंदिरे यात्रा जत्रा शाळा बंद ठेवण्यात आले असून पुणे जिल्ह्यात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही याला केराची टोपली दाखवत ग्रामपंचायत कोरेगाव भिमा येथे आठवडे बाजार भरवण्यात आला आहे, त्यामुळे नागरीकांना याचे गांभीर्य नाही का याचाच मोठा प्रश्न या ठिकाणी दिसत आहे.

ठाणे, पुणे येथेही दुकाने बंद

ठाण्यातही तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कल्याण-डोंबिवलीतही २० ते ३१ मार्च पर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसे आदेशच केडीएमसीने आज जारी केले आहेत. तसेच करोना रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांनी गुरुवारपर्यंत पुण्यातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढचे तीन दिवस पुण्यातील ४० हजार दुकाने उत्स्फूर्तपणे बंद राहणार आहेत.