ठाणे : कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रूग्णांची संख्या ३४ झाली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आजपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरातील भाजी आणि किराणांची दुकाने संध्याकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतलाय. कल्याण-डोंबिवली शहर परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
BreakingNews । कल्याण - डोंबिवलीत आज संध्याकाळ ५ वाजल्यापासून सर्व दुकानं बंद, रूग्णांची संख्या ३४ वर गेल्याने प्रशासनाचं पाऊल#COVID19 #Corona #Coronavirus @ashish_jadhao #Mahabharata@CMOMaharashtra #CoronaInMaharashtra pic.twitter.com/FKg9BylxUS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 7, 2020
कल्याण शहरातील कोरोनाची लागण तिसऱ्या टप्प्यावर आहे. तरीही नागरिक सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. घरात राहण्याचे आदेश पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वाढता कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता केडीएमसी प्रशासनाकडून अनेक निर्बंध घातले जात आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता मेडिकल आणि क्लिनिक वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूदेखील १२ तासच उपलब्ध होणार आहेत. सकाळी पाच ते संध्याकाळी पाच या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. संध्याकाळी पाचनंतर या सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन केले असले तरी सर्वच छोट्या-मोठ्या दुकानांत नागरिक खरेदीसाठी रांगा लावतानाचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.. यामुळे सुरक्षित अंतर ठेवण्याच्या आवाहनाचा फज्जा उडत आहे. भाजी खरेदीसाठीही गर्दीही होत लआहे. त्यामुळे सकाळी पाच ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु राहणार आहेत. याचे उल्लंघन कोणी केले तर कायदेशील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.