कोरोनामुळे लग्नात विघ्न; जोडपं आणि वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल

कोरोनामुळे लग्न थांबवलं

Updated: Mar 21, 2020, 07:32 PM IST
कोरोनामुळे लग्नात विघ्न; जोडपं आणि वधू-वर पित्यावर गुन्हा दाखल title=

लातूर : कोरोना पसरु नये म्हणून बंदी आदेश असतानाही वऱ्हाड्यांनी केलेल्या गर्दीमुळं लातुरातल्या एका लग्नात विघ्न आलंय. वऱ्हाड्यांच्या गर्दीत लातूरमध्ये लग्न लावणाऱ्या नवरा-नवरी आणि वधूवर पित्यांवर गुन्हा दाखल झालाय. या शिवाय मंडपवाला आणि पुरोहितावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लातूर शहरातल्या सिग्नल कॅम्प परिसरात हे लग्न होतं. पोलिसांना लग्नाची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश पायदळी तुडवून लग्न सुरु असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. शिवाय पोलिसांनी हे लग्नही थांबवलं.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४वर पोहोचली आहे. राज्यात गेल्या काही तासांमध्ये कोरोनाचे आणखी १२ रुग्ण आढळले आहेत. आज गुजरातमधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एक जण विमानतळावरील कर्मचारी आहे आणि एक पुण्यातील महिला आहे.