भिवंडीतल्या आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव, ३० विद्यार्थी बाधित

मुंबईसह राज्यात कोरोनाचा चढता आलेख कायम

Updated: Jan 3, 2022, 10:28 PM IST
भिवंडीतल्या आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव, ३० विद्यार्थी बाधित title=

ठाणे : देशासह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आश्रमशाळेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. या आश्रमशाळेतील तब्बल ३० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात २३ मुली आणि ५ मुलं तसंच २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या आश्रमशाळेतील मुलांना सर्दी, तापाची लक्षणं आढळून आल्याने चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून १९८ विद्यार्थ्यांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. यात ३० विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. 

कोरोना बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

राज्यात कोरोना रुग्ण १२ हजार पार
राज्यातील गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांचा चढता आलेख कायम असून गेल्या २४ तासात राज्यात १२ हजार १६० रुग्ण आढळून आले आहेत. तर ओमायक्रॉनची राज्यात ६८ प्रकरणं नोंदवली गेली आहेत. राज्यात आज ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज मुंबईत ८ हजार ८२ रुग्णांची नोंद झाली.