योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Changan Bhujbal) यांनी नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
नाशिक जिल्ह्यात 28 डिसेंबरला कोरोनाची (Corona) रुग्णसंख्या 540 इतकी होती, आता 5 जानेवारीला हीच रुग्णसंख्या 1461 वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कितीतरी पटीने वाढतेय. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणेच नाशिकमध्येही 10 आणि 12 वीचे वर्ग सोडून इतर वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार (no vaccine no ration) नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातही असा कटू निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा लागू शकतो, हा सर्व राज्यांसाठी इशारा आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
कठोर निर्बंधांसाठी भाग पाडू नका
नाशिकमध्ये यापुढे दोन्ही लस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, लसीकरण करा, कठोर निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असा इशाराही छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे. तसंच यापुढे जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री लागू केली जाणार आहे.