कोरोनाने ज्या बालकांचं आईवडिलांचं छत्र हरपलं....त्यांना या प्रकारे विकण्याचा प्रयत्न?

देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ज्यामुळे अनेक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Updated: May 4, 2021, 09:47 PM IST
कोरोनाने ज्या बालकांचं आईवडिलांचं छत्र हरपलं....त्यांना या प्रकारे विकण्याचा प्रयत्न? title=

मुंबई : देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. ज्यामुळे अनेक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोकांच्या मृत्यूमुळे त्यांची मुलं पोरकी झाली आहेत. त्यांच्या डोक्यावरील आई-वडिलांची सावलीच अचानक नाहीशी झाल्याने त्या मुलांना कुठेच आधार मिळत नाही. काही मुलांचे नातेवाईक देखील त्यांची काळजी घ्यायला तयार नाहीत. ज्यामुळे या मुलांच्या मागे पुढे त्यांना पाहायला कोणीच नाही आणि या गोष्टीचा फायदा अनेक असामाजिक घटक घेत आहेत. अशा मुलांची माहिती सोशल मीडियावर शेअर करून या मुलांना दत्तक देण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून बर्‍याच मुलांना दत्तक देऊन अनेक असामाजिक घटक निरपराध जोडप्यांकडून पैसे घेत आहेत. अशा घटना महाराष्ट्र सरकारच्या नजरेत आल्या आहेत आणि ही बेकायदेशीर वागणूक थांबवण्यासाठी सरकार आता पावले उचलत आहे.

कोविडमुळे ज्यामुलांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांची काळजी घेण्यास कोणीही नाही अशा मुलांबद्दल माहिती मिळाल्यास अशा मुलांविषयी माहिती  1098 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. किंवा स्टेट एडॉप्शन रिसोर्स एजेंसी (SARA) महाराष्ट्राच्या 8329041531 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी. तसेच अनाथांच्या असहायतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

दत्तक घेण्याच्या नावाखाली कोविडमध्ये आई-वडिलांना गमावलेल्या मुलांची विक्री

महिला आणि बालविकास विभागाकडे, कोरोना कालावधीत उद्भवलेल्या संकटात अशा अनाथ मुलांची काळजी, शिक्षण, आरोग्याची जबाबदारी आली आहे ज्यांचे पालक कोरानामुळे दगावले आहेत. बर्‍याच ठिकाणी अशा मुलांच्या बालविवाहाची घटना उघडकीस आली आहे, यावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग पूर्णपणे सतर्क आहे. बर्‍याच असामाजिक घटक अशा परिस्थितीत सुद्धा संधी मिळवण्याच्या शोधात आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरचा वापर करून ते संबंधित मुलांबद्दंल भावनिक पोस्ट करून दत्तक घेण्यासाठी संदेश देत आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना दत्तक घेणे - गंभीर गुन्हा

अशाप्रकारे, सोशल मीडियाद्वारे मुलांना दत्तक घेणे हा एक गंभीर गुन्हा आहे. असे कार्य करणारे लोक भारतीय दंड संहिता 1860, बाल संरक्षण कायदा 2015 नुसार आणि दत्तक नियम 2017 नुसार, कठोर कारवाई करण्यास पात्र आहेत. म्हणून लोकांना असे आवाहन आहे की, ज्यांना मूल दत्तक घेण्याची इच्छा आहे, त्यांनी अशा असामाजिक घटकांना बळी पडू नये.

कोविड कालावधीत असे कोणतेही मुल हरवले असल्यास हेल्पलाईन नंबर 1098 आणि SARA हेल्पलाईन क्रमांकावर 8329041531 वर संपर्क साधा. किंवा, आपल्या जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती किंवा स्थानिक पोलिसांच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि त्या मुलांच्या त्यांच्या स्वाधीन करा. त्यांची संपूर्ण काळजी प्रशासनाकडून घेतली जाईल.