नाना पटोलेंनी उल्लेख केलेला तो 'गावगुंड मोदी' सापडला, पण...

राजकारण तापवणारा तो व्यक्ती खरचं 'गावगुंड मोदी' आहे का?

Updated: Jan 21, 2022, 07:33 PM IST
नाना पटोलेंनी उल्लेख केलेला तो 'गावगुंड मोदी' सापडला, पण...  title=

भंडारा : काँग्रेस (Congress) प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'मी मोदीला मारूही शकतो, व शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केल्यावर संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते.  या वक्तव्याविरोधात भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनं केली. 

यानंतर नाना पटोले यांनी सारवासारव करत आपण पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्याविषयी नाही तर मोदी नावाच्या गावगुंडाविषयी बोलत असल्याचं सांगितलं. आता नाना पटोले ज्या मोदीचा उल्लेख करत होते तो मोदी पोलिसांना सापडला असून पोलिसांनी चौकशी करुन अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे.

तो व्यक्ती आला समोर
नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मीच तो व्यक्ती असल्याचं सांगत उमेश प्रेमचंद घरडे हा व्यक्ती समोर आला असून त्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  लाखनी तालुक्यातील गोंदी गावातील उमेश प्रेमचंद घरडे आहे, याला दारूचं वेसन असल्याने त्याची पत्नी आणि संपूर्ण परिवार नागपूर इथं राहतात. उमेश दोन वर्षांपासून गावातच एकटाच राहतो.

मला दारुचं व्यसन आहे त्यातूनच नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोललो, त्यानंतर मी घाबरुन समोर येत नव्हतो असं उमेश घरडे याने म्हटलं आहे. नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच असलेल्या दावा उमेश घरडेने केला आहे. 

वकील सतीश उके यांनी उमेश घरडे याला पत्रकारांसमोर आणलं. हा गावगुंड मोदी दारु विकतो, पितो आणि त्यातूनच त्याने नाना पटोले  यांच्याविरोधात अपशब्द वापरले, असा दावा सतीश उके यांनी केला. त्याच्या मागे अनेक लोक लागल्यामुळे घाबरुन तो आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणलं असं वकील सतीश उके यांनी म्हटलं आहे.  2020 पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं उमेशने सांगितलं. मात्र, मोदी नाव कसं पडलं हे मात्र सांगण्यास नकार दिला. पत्रकारांच्या प्रश्नाची उत्तर अर्ध्यावर सोडून या कथित मोदीनं काढता पाय घेतला.

पोलिसात कुठलीही तक्रार नाही
दारु पिऊन शिवीगाळ करत असल्याचं उमेश घरडे यांनी म्हटलं असलं तरी त्याच्याविरुद्ध पोलिसात कुठलीही तक्रार दाखल नाही. किंवा तो गाव गुंडही नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. दरम्यान, पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारल्यावर त्याची बोबडी वळली, त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.