काँग्रेसचं शिष्टमंडळ निघालं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे जेष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी संध्याकाळी जाणार आहे.

Updated: Feb 17, 2022, 12:46 PM IST
काँग्रेसचं शिष्टमंडळ निघालं मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेनंतर आज पहिल्यांदाच थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. काँग्रेस आमदारांना निधी वाटप आणि अन्य मुद्द्यावरून ही भेट घेण्यात येणार आहे. 

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ही निवड याच अधिवेशनात करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे. 
 
काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलंय. वर्षभरातील काही मुद्दे प्रलंबित आहेत. तसंच निधी वाटप आणि इतर मुद्देही आहेत. एका पक्षाचे सरकार असतानाही प्रश्न असतात. पण, आज राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना ते प्रश्न सोडवावे लागतात यासाठी ही भेट असल्याचं ते म्हणाले.

भाजपची सध्याची जी कार्यपद्धती आहे त्याला आमचा आक्षेप आहे. केंद्रीय संस्थांचा उपयोग राजकारणासाठी केला जातोय. त्याहीपलिकडे कुटुंबाच्या सदस्यांपर्यंत पोहचत आहेत. हे सगळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केलं जातंय. परंतु, मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.