सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा; कारभारावर गंभीर आक्षेप

मनसे विद्यार्थी सेनेने सिनेटच्या मुद्द्यावर आक्रमक होत मुंबई विद्यापीठात आंदोलन केले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला तसेच कुलुगरांना विदूषकाचे मास्क दिले.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Nov 6, 2023, 07:28 PM IST
सिनेट निवडणुकीच्या मुद्द्यावरून मनसेचा मुंबई विद्यापीठात राडा; कारभारावर  गंभीर आक्षेप title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई :  सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक होत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना जाब विचारला. यावेळी ठिय्या आंदोलन करत कुलगुरूंना विदूषकाची प्रतिमा भेट दिली. तसेच कुलगुरू राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत अशा आशयाच्या घोषणा देत मनविसे शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या केले. यावेळी सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे उपस्थित होते.

 मुंबई विद्यापीठाचा विदूषकी कारभार सुरू आहे म्हणून अशा पद्धतीने विदूषकाचे मास कुलगुरूंना मनसे विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि सुरक्षा रक्षकांची बाचाबाची झाली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलल्याने आणि नव्याने मतदार नोंदणी करावी लागत असल्याने मनसे विद्यार्थी सेना प्रामुख्याने आक्रमक झाली.

या सर्व मुद्द्यावरती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांना मनसेच्या शिष्टमंडळाने मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी लिहिलेले एक पत्रही दिले.  मनसेने उपस्थित केलेल्या या विविध मुद्द्यावरती विद्यापीठ प्रशासनाने आम्ही सकारात्मक पद्धतीने या सर्व मुद्द्यांचा विचार करून मार्ग काढू अशा पद्धतीचे आश्वासन दिले आहे.

काय आहे या पत्रात?

मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीबाबत गेल्या काही महिन्यांत विद्यापीठ प्रशासनाने वारंवार चुकीचे निर्णय घेतल्यामुळे मुंबई विद्यापीठाची देशातील 'प्रतिष्ठित विद्यापीठ' ही ओळख पुसली जाऊन 'हास्यास्पद विद्यापीठ' अशी नवीन ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झाला आहात, त्याबद्दल आपल्यासह विद्यापीठाच्या सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन!

गेल्या महिन्यात, २९ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ प्रशासनाने रात्री उशीरा सिनेट निवडणुकीचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. आधीची निवडणूक रद्द करताना ज्याप्रमाणे रात्रीचा मुहूर्त शोधण्यात आला होता, अगदी त्याचप्रमाणे निवडणुक नव्याने जाहीर करण्यासाठीही पुन्हा एकदा रात्रीचाच मुहूर्त निवडण्यात आला. एकंदरच आपल्या कारकिर्दीत विद्यापीठात आता 'रात्रीस खेळ चाले' जोरात सुरु आहे. त्याबद्दलही आपलं अभिनंदन!

पत्रात मनसेचे गंभीर आक्षेप

१. विद्यापीठ प्रशासनाने तयार केलेल्या मतदार यादीवर काहींनी गंभीर आक्षेप घेतले म्हणून प्रशासनाने निवडणूक रद्द केली. मात्र, तत्पूर्वी दुबार व बनावट मतदारांची नावं अंतिम मतदार यादीतून वगळून मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. आता प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत नव्याने मतदार नोंदणी करण्यास सांगितलं आहे. ज्या मतदारांनी स्वत:ची नोंदणी प्रामाणिकपणे केली होती, त्यांच्यावर हा सरळसरळ अन्याय आहे. म्हणूनच प्रशासनाने तयार केलेल्या (आधीच्या) अंतिम मतदार यादीत जे मतदार नियमानुसार आहेत, त्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्यास सांगू नये.  (आधीच्या) अंतिम मतदार यादीत ज्यांच्या नोंदणीबाबत काही गंभीर आक्षेप किंवा शंका उपस्थित झाल्या आहेत, त्यांना यादीतून वगळावे किंवा त्यांना पुन्हा एकदा नव्याने नोंदणी करण्यास सांगावे. पण मतदार यादीतील 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्यात येऊ नये, हा आमचा आग्रह आहे.

२. नव्या वेळापत्रकात आॅनलाइन नोंदणीची अंतिम मुदत तसंच आॅनलाइन फाॅर्मची प्रिंटआऊट विद्यापीठाच्या कार्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत नमूद करण्यात आली आहे. मुळात नोंदणीची प्रक्रिया संपल्यानंतर लवकरात लवकर मतदार यादी तयार करता यावी म्हणून आॅनलाइन नोंदणीचा प्रशासनाने अवलंब केला आहे. मग आॅनलाइन फाॅर्मची प्रिंटआऊट कार्यालयात आॅफलाइन जमा करण्याचा फार्स कशाला? प्रशासनाला आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया हवी असेल तर प्रिंटआऊट जमा करायला सांगू नयेत आणि आॅनलाइन नोंदणी प्रक्रियेबाबत काही गंभीर आक्षेप- शंका उपस्थित होत असतील तर सरळ पूर्वीप्रमाणे मतदार नोंदणी प्रक्रिया आॅफलाइनच ठेवावी. प्रशासनाने आॅनलाइन आणि आॅफलाइन या दोन्ही प्रकारांचा नोंदणी प्रक्रियेत समावेश करुन मुंबई विद्यापीठाचं आणखी हसं करू नये.

३. निवडणुकीच्या नव्या मतदार नोंदणी प्रक्रियेत आधारकार्ड अपलोड करणे सक्तीचे नाही. ते सक्तीचे करावे.

४. मतदाराच्या फोटोला नव्या फाॅर्ममध्ये स्थानच नाही. मतदार केंद्रावर मतदार जेव्हा मतदानासाठी येईल तेव्हा त्याची ओळख पटवायची असेल तर त्याचा फोटो फाॅर्मवर असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार म्हणून नोंदणी केलेल्या नावावर दुसरीच व्यक्ती मतदान करू शकेल आणि बनावट मतदानाचा टक्का वाढेल. हे रोखण्यासाठी आधीच्या फाॅर्मप्रमाणे नव्या फाॅर्ममध्येही मतदाराचा फोटो असायलाच हवा.

५. ज्या मतदारांनी फाॅर्म भरले आहेत, त्यांना मतदार नोंदणीची मुदत संपेपर्यंत त्यांच्या वैयक्तिक फाॅर्ममध्ये काही बदल (एडिट) करण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यायला हवा. हा पर्याय उपलब्ध करुन दिल्यामुळे नोंदणी प्रक्रियेतील अर्ज बाद होण्याचे प्रमाण कमी होईल आणि अधिकाधिक पदवीधरांना सिनेट निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.

६. विद्यापीठ प्रशासनाने २९ ऑक्टोबरच्या रात्री परिपत्रक काढून ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करण्यास सांगितले. त्यानुसार ३०-३१ ऑक्टोबर, १-२ नोव्हेंबर हे पहिले चार दिवस युजरनेम आणि पासवर्ड माहित असल्यास आधीच्या नोंदणीच्या वेळी मतदाराने अपलोड केलेले आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट आदी डॉक्युमेंट्स नव्या नोंदणीतही फॉर्म भरताना दिसत होते. त्यामुळे मतदाराला हे डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करावे लागत नव्हते. पण ३ नोव्हेंबरपासून अचानक संबंधित सॉफ्टवेअर प्रणालीत एक अनावश्यक बदल करण्यात आला आणि पहिले चार दिवस दिसणारे डॉक्युमेंट्स अक्षरशः गायब झाले. त्यामुळे मतदारांना डॉक्युमेंट्स पुन्हा स्कॅन करून अपलोड करावे लागत आहेत. यात भर म्हणजे, आधी फॉर्म भरताना फक्त युजरनेम आणि पासवर्ड पुरेसे होते, पण ३ नोव्हेंबरपासून 'ओटीपी' सक्तीचा करण्यात आला. विद्यापीठ प्रशासन सॉफ्टवेअर प्रणालीत हवे तेव्हा, हवे ते बदल करत आहे; ते कुणाच्या दबावाखाली? विद्यापीठाच्या या मनमानी कारभारामुळे पदवीधर मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अर्थात, याचीही जबाबदारी तुम्ही स्वीकारणार नाहीच.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वरील मुद्द्यांचा आणि मागण्यांचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करुन मतदार नोंदणी प्रक्रियेतील संबंधित त्रुटी रोखण्यासाठी त्वरित कार्यवाहीचे आदेश द्यावेत आणि सिनेट निवडणुकीच्या नावाखाली गेले वर्षभर धावणारी मुंबई विद्यापीठाची 'काॅमेडी एक्प्रेस' थांबवावी; हीच एकमेव अपेक्षा. येत्या दोन दिवसांत या पत्रातील मुद्द्यांबाबत आपण जाहीर स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा, मुंबई विद्यापीठाच्या या गैरकारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या हजारो सुशिक्षित, पदवीधर पदाधिकारी- कार्यकर्त्यांसह विद्यापीठात आक्रमक आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याची नोंद घ्यावी.