दिनेश दुखंडे / प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वाद पेटलाय. नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादन अधिसूचना रद्द केल्याची घोषणा शिवसेनेनं केली खरी... पण मुख्यमंत्र्यांनी या घोषणेतली हवाच काढून टाकलीय.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार प्रकल्पावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्येच एकवाक्यता नसल्याचं सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाऊन प्रकल्पग्रस्तांची सभा घेतली. या सभेत नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
सुभाष देसाईंच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनाही दहा हत्तींचं बळ आलं. नाणार प्रकल्प गेला, अशी गर्जना त्यांनी राणा भीमदेवी थाटात केली. नाणारसोबत जैतापूरचा प्रकल्पही नागपूरला किंवा गुजरात न्या, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मोदी-शाह जोडीवर तोंडसुख घेतलं.
मात्र, शिवसेनेचा हा जल्लोष औट घटकेचाच ठरला. मंत्र्यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नाही, याची आठवण सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करून दिली... आणि नाणारचा प्रकल्प रद्द करण्यात आला नसल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान, अधिसूचना माझ्या सहीनं निघाली असल्यानं ती मीच रद्द करणार, असं उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावलंय. मुख्यमंत्र्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे... मी माझी कार्यवाही केली आहे... ते जे काय बोलले ते मला खोडायचे नाही... त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे, मला माझं मत मांडायचा अधिकार आहे, असंही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय.
नाणारची अधिसूचना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकलेत... हा वाद शिवसेना-भाजप युतीच्या आणि पर्यायानं सरकारच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तासाभरात फिरवल्यानं आता शिवसेना सरकारमध्ये राहणार की जाणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.