बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना महत्त्वाचं आवाहन

कोरोनाविरुद्धचा मुकाबला जोरात सुरू.....

Updated: Jul 14, 2020, 07:45 PM IST
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं मुस्लीम बांधवांना महत्त्वाचं आवाहन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना यंदाचं bakra eid 2020 साजरा करण्याबाबत अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढवण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करत आहोत, असं म्हणत मागील चार महिन्यांमध्ये साजरा करण्यात आलेल्या सणवारांचं उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

मागील ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचं पालन करून साजरी व्हावी अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी बकरी ईदसंदर्भात आयोजित एका ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसंच इतर मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी देखील बकरी ईद साधेपणाने आणि कुठेही गर्दी न करता साजरी करावी असं आवाहन यावेळी केलं. 

bakra eid 2020 साजरा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्देही मांडले. 

वारकऱ्यांनी यंदा साधेपणानं वारी साजरी केली. लालबागच्या राजा या गणेशोत्सव मंडळानं यावर्षी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता आरोगयोत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच काम नये, त्यामुळं आपण याबाबत सहकार्यासाठी मुल्ला- मौलवी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

 

जुलै महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त करत तसं न झाल्यास आणि ऑगस्टपासून हा आलेख वर गेल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सध्याच्या घडीला युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे आपली जबाबदारी पार पाडत सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांवर ताण वाढत चालला आहे ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

मुख्यमंत्र्यांनी मुस्लीम बांधवांसाठी केलेली महत्त्वाची आवाहनं खालीलप्रमाणे 

* मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी.
* मागील ४ महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरी केली.
* मुस्लीम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी.
* लोकांनी गर्दी टाळावी आणि संसर्ग वाढेल अशी कुठलीही कृती टाळावी.
* नेत्यांची जबाबदारी समाजाला दिशा दाखवणं आहे. त्यामुळं आपण लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करावं.

सण हे दरवर्षी येतात, तेव्हा २०२० हे वर्ष आपण दिनदर्शिकेतून काढून टाकू आणि पुढच्या वर्षीपासून आणखी जोशात सण साजरा करु असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.