लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. 

Updated: Jul 14, 2020, 06:56 PM IST
लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड title=

शशिकांत पाटील, झी मिडिया, लातूर : लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी मोठा राडा करत कार्यालयाची तोडफोड केली. हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. महाबीज, अकोला या कंपन्यांविरोधात लातूर जिल्ह्यात ३८१२ तक्रारी आहेत. तर इतर खाजगी कंपन्यांविरोधात ४२६९ तक्रारी आहेत. 

दोषी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठीचा पाठपुरावा लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाकडे अनेकदा करुनही महाबीजवर जिल्ह्यात एकही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे कृषी विभाग महाबीजला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. 

राज्यात अनेक कंपन्यांनी बोगस बियाणं दिली असून मोठ्या प्रमाणात कंपन्या दोषी आहेत. आतापर्यंत ५३ हजार तक्रारी दिल्या. परंतु केवळ ५० ते ५५ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. अशा कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचं दिसत आहेत. ३ तीन हजार तक्रारी महाबीजच्या विरोधात असूनही, एकही गुन्हा लातूरमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे दोषी कंपन्यांसह महाबीजवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी नुकसान भरपाई मिळावी. अनेकदा निवेदनं देऊनही सरकार काहीही करत नसल्यामुळे झोपलेल्या कृषी विभागाला जागं करण्यासाठी हे आंदोलन केलं असल्याचं, मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितलं.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी ४ दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं. त्यांना काय कारवाई केली याची माहिती दिली होती. आतापर्यंत खाजगी १५ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून महाबीजवर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, हे समजून सांगितल्यानंतरही केबिनच्या काचा, कंम्प्यूटर फोडले असल्याचं, अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी सांगितलं.