मुंबई : कोरोना रुग्णांचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात नियंत्रणात आणल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेचे आभार मानले. ऑक्सीजन रेमीडेसीवर इंजेक्शन उपलब्धता या विषयावर त्यांनी भाष्य केले. तसेच महाराष्ट्र मिशन ऑक्सिजनचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. त्यानंतर हे "महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन" (Maharashtra-Mission Oxigen) नेमकं काय आहे ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
कोरोनाची दुसरी लाट येण्याआधीच सतर्क राहून महाराष्ट्र सरकारने चाचण्या वाढवल्या. बेड्स उपलब्धतेवर लक्ष केंद्रीत केलं. मुंबई पालिकेच्या नियोजनाचं सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केलं. दरम्यान अपुऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचा फटका राज्यासह संपूर्ण देशाला बसला. यातून बोध घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या कल्पनेसाठी पुढाकार घेतला. ऑक्सिजनचा निर्मिती, साठवण आणि वितरण या बाबत महाराष्ट्राला स्वावलंबी बनविण्यासाठी "महाराष्ट्र - मिशन ऑक्सिजन" ही मोहीम सुरू कण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्राला 1800 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता आहे. यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होतेय. साधारण 500 मेट्रिक टन ऑक्सिजन इतर राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने उपलब्ध होतोय. सद्य स्थितीत असलेल्या 38. PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे.
तसेच येणाऱ्या कमी काळात आवश्यकतेचा विचार करता आणि राज्याला स्वावलंबी करण्यासाठी 382 अतिरिक्त PSA प्लांटस ची स्थापना करण्यात येत आहे. त्यातून जवळपास 240 मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांटस जून अखेरीस सक्रिय होतील अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलीय.
या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील. भविष्यातील ऑक्सिजनच्या आवश्यकतेचा दीर्घकालावधीत विचार करता, विभागीय स्तरावर शासनामार्फत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन निर्मितीकरता अतिरिक्त प्लॉटस ची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात दर दिवशी अतिरिक्त 300 मेट्रिक टनचा पुरवठा होणार आहे.
यासोबतच तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर ऑक्सिजन साठवणीचे विकेंद्रीकरण करण्याचे काम सुरु आहे. विभागीय स्तरावर 750 मेट्रिक टन आणि जिल्हा स्तरावर 300 मेट्रिक टन साठवण क्षमता तयार केली जाणार आहे.
तसेच स्थानिक उद्योजकांच्या मदतीने 600 मे.टन अतिरिक्त साठवण क्षमता तयार होऊ शकेल. सध्याच्या 1600 मेट्रिक टन साठवण क्षमतेनंतर ही महाराष्ट्राची साठवण क्षमता 3250 मेट्रिक टन होईल.
या साठवण क्षमतेच्या विकेंद्रिकारणामुळे वाहतुकीची आवश्यकता कमी होईल आणि ऑक्सिजनचे वितरण नियमित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन क्षमता देण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी म्हणून शासनातर्फे अन्य योजनांचाही विचार सुरु आहे. याशिवाय 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' सारख्या प्रारुपंचा ही शासनाकडून विचार सुरु आहे. यामुळे रूग्णांपर्यंत थेट ऑक्सिजन पोहोचू शकणार आहे.