Varsha Bungalow Meeting: महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्पामधून भरीव निधी मिळालेला नाही अशी टीका राज्यातील विरोधकांनी केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशसाठीच तिजोरी खुली केली असा दावा होत असतानाच महाराष्ट्र भाजपाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज्याला अर्थसंकल्पामधून काहीही मिळालेलं नाही हा दावा फेटाळून लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या टीकेवरुन विरोधकांवर निशाणा साधला. मात्र आता केवळ आरोप प्रत्यारोपांवर अवलंबून न राहता राज्य सरकारकडून थेट राज्यात अधिक निधी आणण्यासाठी हलचाली सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्या म्हणजेच 27 जुलै रोजी नवी दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठक पार पडत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीच्या दिवशीच दिल्लीत पोहचतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र आर्थिक, समाजिक बाबीसंदर्भात केंद्र सरकारला सल्ला देणाऱ्या निती आयोगासमोर राज्याची बाजू मांडण्यासाठी तिन्ही नेत्यांनी गुरुवारी रात्री मुंबईत महत्त्वाची बैठक पार पाडल्याचे समजते.
गुरुवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर जवळपास दीड ते दोन तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमध्ये नीती आयोगा बैठकीत महाराष्ट्रासाठी काय काय मागायचे यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्राला कोणताही निधी अर्थसंकल्पामध्ये मिळालेल्या नसल्याची टीका होत असल्याने ही कसर नीती आयोगाच्या माध्यमातून भरुन काढण्याचं राज्यातील सरकारचा विचार आहे. त्यामुळे आता थेट निती आयोगाकडून राज्यासाठी मोठं पॅकेज मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्र्यांकडूनही प्रयत्न केला जाईल, असं समजतं.
आज सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचतील. निती आयोगाची बैठक 27 जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. भाजपाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये हजर राहणार आहेत. फडणवीस उद्या दिल्लीत येण्याची शक्यता आहे. भाजपाची ही बैठक उद्या संध्याकाळी आहे. शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते दिल्लीत वेगळ्या राजकीय भेटी घेण्याची शक्यता असून आज संध्याकाळी शिंदे अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. शिंदेंचा दोन दिवसांचा दौरा असल्याने शनिवारी सायंकाळी फडणवीस आणि शिंदे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी अजित पवारही दिल्लीला जातील असंही सांगितलं जात आहे.
नक्की वाचा >> '76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर
महायुतीमधील नेते मंडळी ज्याप्रकारे युतीमध्ये खडा पडेल असे भाष्य करतात ते पाहता युतीमधील नेत्यांनी युतीमधील पक्षांबद्दल बोलताना वादग्रस्त भाषा टाळावी असे ठरल्याचं समजतं. आपल्या अशा नेत्यांना चांगलाच समज द्यावा असेही तिन्ही पक्षांनी या बैठकीत ठरवलं आहे. तर राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर विधानसभाला कशाप्रकारे सामोरे जायचे या विषयी ही चर्चा झाल्याचं सूत्रांनी दिली माहिती.