CM Eknath Shinde: आरोपाला उत्तर कामाने देणार, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्त्युत्तर दिले. हा वर्धापन दिन आपल्यासाठी ऐतिहासिक आहे. येता-जाताना मला कितीतरी लोकं हात दाखवत होती. लोक जल्लोष करत होती, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यावर लक्ष केंद्रीत केले होते.
बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले पण तुम्ही त्यांचा भरसभेत अपमान केल्याचे ते उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले. पक्षप्रमुखाने सर्वांना एकत्र घ्यायचे असते. कार्यकर्ते मोठे करा. कार्यकर्ते मोठे केल्याशिवाय पक्ष मोठा होत नाही, असा सल्ला मी द्यायचो असे एकनाथ शिंदे म्हणाले. नेत्यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
मुंबई पालिका, विधानसभा आणि येणारी प्रत्येक निवडणूक शिवसेना-भाजपा युतीच्या माध्यमातून लाढविणार, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मी कर्ज काढून निवडणुकींचा खर्च केला. निवडणुका झाल्यावर नेत्यांना घेऊन मातोश्रीवर जायचो पण काही प्रतिसाद मिळायचा नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
एकनाथ तुला आता लाखोंचे अश्रू पुसायचे आहेत, हे वाक्य अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणून मी जनतेची सेवा करत असतो, असे ते म्हणाले.
हा एकनाथ शिंदे शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री झाला ते बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि तुमच्या प्रेमामुळे झाला.
श्रीकांत शिंदेनी एकच इच्छा व्यक्त केली मला हॉस्पीटल उघडून द्या. पण त्याची इच्छा मी पूर्ण करु शकलो नाही.
मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्यात काही बदल झाला नाही. होणारही नाही. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता होतो, भविष्यातही कार्यकर्ता राहीन, असे ते म्हणाले.
मी हेलिकॉप्टरने गावी जातो पण तिकडे जाऊन शेती करतो. प्रवासात मी फाईल्स घेऊन जातो. आणि त्या फाईल्सवर सह्या करतो, असे ते म्हणाले.